पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जगण्याला धरूनच होते. पण अप्रत्यक्षरीत्या त्यांचा रयतच्या कामातही हातभार लागत असे. उदाहरणार्थ, शिंदे पतिपत्नी अमेरिकेच्या प्रवासाला निघाले होते. प्रयाणाच्या आदल्या रात्री चंद्रभानशेठ डाकले यांचे चिरंजीव सूरजशेठ डाकले यांनी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवताना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या आठवणी निघाल्या. शशिकलाताईंनी सूरजशेटना असे सुचवले, की त्यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ स्मारकाच्या स्वरूपात काहीतरी योजना करावी. "श्रीरामपूरच्या बी.एड. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासाठी इमारतीची गरज आहे. तुम्ही त्यासाठी देणगी द्यावी म्हणजे त्या वसतिगृहाला तुमच्या स्व. पत्नीचे नाव देता येईल," असेही शशिकलाताई म्हणाल्या. "वहिनीसाहेब ! तुमच्या शब्दाचा मान राखतो व त्याप्रमाणे एक लाख रुपयांची देणगी देतो," असा सूरजशेठनी तत्काळ प्रतिसाद दिला. परदेशातून दोन महिन्यांनी परत आल्यावर सूरजशेठ डाकले यांनी स्वत:हून देणगी दिली आणि गरज लक्षात घेऊन एक लाखाच्या देणगीचा आकडा दोन लाखांवर नेला. बी. एड. महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाचा भूमिपूजन समारंभ २८ ऑक्टोबर १९९१ रोजी शशिकलाताईंच्या हस्ते संपन्न झाला. रावसाहेबांचा पत्रव्यवहार, मुलांचे जन्मदाखले, प्रगतिपुस्तके, घरचा दैनंदिन जमाखर्च, वेगवेगळ्या प्रसंगी काढलेले फोटो, समारंभाची आमंत्रणपत्रे वगैरे गोष्टीही शशिकलाताईंनी वर्षानुवर्षे जपून ठेवल्या आहेत. ही त्यांनी स्वतःच्या आईकडून घेतलेली सवय. शशिकलाताईंनी कधी नोकरी केली नाही, पतीच्या उत्पन्नातच घरखर्च भागवायचे ठरवले व अधिकाचा हव्यास टाळला. दुर्दैवाने आपल्याकडे 'गृहिणी' या शब्दाला योग्य ती प्रतिष्ठा आजही मिळालेली नाही. सर्व महिलांनी 'करिअर' केलेच पाहिजे अशी एक अपेक्षा अलीकडे प्रचलित होत आहे. खरे तर एखादी भिंत जशी असंख्य विटांची बनलेली असते, तसा समाजही असंख्य कुटुंबांचा बनलेला असतो; विटा कच्च्या असतील, तर भिंत भक्कम राहणार नाही व त्याचप्रमाणे कुटुंबे सुदृढ नसतील, तर समाजही बळकट होणार नाही. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे असे, ही कुटुंबे सुसंस्कारित करण्याचे फार मोठे काम गृहिणी करत असते. एकवार कारखान्यातले वा कचेरीतले काम संगणकाच्या यंत्रांच्या साहाय्याने करता येईल, पण गृहिणीचे काम मात्र कुठलेच यंत्र करू शकणार नाही. गृहिणीपदाची ही जबाबदारी शशिकलाताईंनी किती उत्तम प्रकारे पार पाडली, याची साक्ष शशिकलाताई : हे देणे भगवंताचे .. ... ३०७