पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कमाई मानता येईल. - पतिनिधनानंतरही रावसाहेबांच्या आईने शशिकलाताईंच्या प्रेमळ सहवासात तब्बल पंधरा वर्षे काढली. २३ डिसेंबर १९८० रोजी त्या गेल्या. त्यावेळची एक आठवण रावसाहेब सांगतात : "आईचा तो अखेरचा आजार. आपल्याला अर्धांगवायूचा झटका येण्याची चिन्हे आईच्या लक्षात आली होती. आम्ही सर्व भावंडं जमलेलोच होतो. अस्पष्ट व घाबऱ्या आवाजात आई कावरीबावरी नजर करून विचारत होती – 'ही कुठंय?' आम्ही सगळ्या चारही बहिणींना एकेक करत आईपुढे केलं, पण तिची इच्छा वेगळीच दिसत होती. तेवढ्यातच शशी पुढे झाली. आईने तिला पाहिलं आणि लगेच तिचा हात हातात घट्ट धरला, तो सोडलाच नाही. 'ही, ही' म्हणताना आईच्या चेहऱ्यावर समाधान होतं. थोड्याच वेळात तिची शुद्ध हरपली. स्वत:च्या मुलींपेक्षाही शशीला 'आपली' मानून आईने तिचा हात घट्ट धरून ठेवला होता. किती बोलका प्रसंग !" सासू-सुनेचे नाते किती जिव्हाळ्याचे होते याची यावरून आपल्याला कल्पना येते. शशिकलाताईंना शेतीची काहीच माहिती नव्हती. पण आता घरचीच शेती म्हटल्यावर त्यांनी सगळी माहिती करून घेतली. शेतीची व दुग्धव्यवसायाची अधिकाधिक जबाबदारी त्या घेऊ लागल्या. शेतीचा हिशेबही त्याच ठेवत. एकदा तर त्यांच्या शेतातला ऊस पेटला आहे, अशी बातमी कानावर येताच त्यांनी धाडसाने आपली जीप बाहेर काढली व त्या एकट्याच तडकाफडकी शेतावर गेल्या. घरी त्यावेळी दुसरे कोणीच नव्हते. शेतातील गड्यांच्या मदतीने मोठ्या शौर्याने त्यांनी ती आग विझवली. आज रावसाहेबांचा शेतीव्यवसाय व दुग्धव्यवसाय पूर्वीपेक्षा खूपच कमी उरला आहे व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव राजीव सर्व व्याप सांभाळतात, पण तरीही शशिकलाताईंचे सगळ्यांवर लक्ष असते व गरज पडेल तेव्हा त्या मदतही करत असतात. आजही त्यांच्या महादेव मळा या निवासस्थानात कोंबड्या पाळलेल्या आहेत आणि रोज सकाळी उठल्यानंतर सगळ्या परिसरात फेरी मारणे आणि कोंबड्यांनी जागोजागी घातलेली अंडी गोळा करणे हे काम त्याच हौसेने करतात. कोंबड्यांच्या अंडी घालण्याच्या जागा त्यांना नेमक्या ठाऊक आहेत! रयत शिक्षण संस्थेच्या कामात शशिकलाताईंचा थेट असा सहभाग नव्हता. किंबहुना पतीच्या त्या संस्थात्मक कामात आपण ढवळाढवळ करणे गैर ठरेल या जाणिवेतून त्यांनी आपणहूनच तसे अंतर राखले व ते त्यांच्या एकूण तत्त्वनिष्ठ अजुनी चालतोची वाट... ३०६