पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोल्हापूरपेक्षा इथले वातावरण खूपच वेगळे होते. नाही म्हटले तरी हा सगळा ग्रामीण, शेतीप्रधान भाग. कोल्हापूरचा खानदानीपणा, संस्थानातले रीती रिवाज, तिथले कलाप्रेम, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक चर्चा यांतले काहीच त्यावेळच्या श्रीरामपुरात नव्हते. माणसांची वागणूकही खूपशी ग्रामीण वळणाची. साधे, जुनाट कपडे, मोठ्याने बोलणे-हसणे; गप्पांचा विषय मुख्यत: शेती हाच. शेकदारांकडच्या शशिकलाताई या वातावरणात कितपत रमतील याविषयी नाही म्हटले तरी सगळ्यांच्या मनात थोडी धाकधूक होती, पण आपल्या प्रेमळ वागण्याने शशिकलाताईंनी बघता बघता सगळ्यांची मने जिंकली. आपल्या घरी राहणाऱ्या सासू-सासऱ्यांची तर त्यांनी अगदी मनोभावे सेवा केली. ड्रायव्हिंग येत असल्यामुळे त्यांना श्रीरामपुरातील त्यांचे फॅमिली डॉक्टर हरीभाऊ चाटुफळे यांच्याकडे किंवा जर्मन हॉस्पिटलमध्ये नेण्या-आणण्याचे काम बहुतेकदा शशिकलाताईच करत. त्या काळी श्रीरामपूरमध्ये ड्रायव्हिंग करणाऱ्या त्या आणि डॉ. वडाळकरबाई या दोनच महिला होत्या. डोक्यावरून पदर घेतलेल्या, ठसठशीत कुंकू लावलेल्या, अगदी पारंपरिक वळणाच्या दिसणा-या शशिकलाताई सफाईदारपणे गाडी चालवताना दिसल्या, की 'अरे, ती बघ गाडी चालवणारी बाई!' म्हणत मुले रस्त्याच्या कडेला उभी राहायची. मोठी माणसेही काहीशा विस्मयाने बघत राहत. सासू-सासऱ्यांना त्या खूपदा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांकडेही भेटीला घेऊन जात. वय झाले, की लोकांना आपल्या माणसांची ओढ लागते, स्वत:ला भरपूर वेळ असल्यामुळे आपल्याशी गप्पा मारायला रिकामा वेळ असलेली आपली माणसेही त्यांना हवी असतात. पण वेळेअभावी, वाहतुकीच्या अडचणीमुळे खूपदा ती इच्छा पूर्ण होत नाही. ज्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणतात, तीही सोय छोट्या गावी उपलब्ध नसते. अशा प्रसंगी ड्रायव्हिंग येणारी आणि मुख्य म्हणजे मायेने आपले सगळे करणारी सून म्हणजे वृद्ध सासू-सासऱ्यांना वरदानच होते. लौकरच त्यांना शशिकलाताईंनी इतका जीव लावला, की ते सुनेला अगदी मुलीप्रमाणेच समजू लागले. रावसाहेबांच्या तापट स्वभावामुळे त्यांच्याशी संवाद साधायला खूपदा त्यांना व घरच्या इतरांनाही काहीशी भीती वाटायची. ते सर्व बोलणे मग शशिकलाताईंमार्फत होऊ लागले. आईवडिलांना नवे कपडे घेणे, बहिणींना भाऊबिजेची ओवाळणी घालणे, त्यांना काय हवे नको ते बघणे, सणवार करणे हे सर्वही त्यांच्याच सल्ल्याने होऊ लागले. पुढे ४ सप्टेंबर १९६८ रोजी सासरे घशाच्या कॅन्सरने गेले. शेवटचे उपचार चालू असताना ते आपल्या पत्नीला म्हणाले, "मी आता फार दिवस नाही. तू सदैव शशीला धरून राहा." त्यांनी असे म्हणावे ही शशिकलाताईंची फार मोठी शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ३०५