पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मशिनरी म्हणजे परदेशातून आयात केलेली बरीच मोठी ऑइल इंजिन्स होती. त्या इंजिन्सची सर्व माहिती घेऊन मशिन किती काळ चाललं तर किती ऑइल लागेल याचा आबांनी अतिशय परिपूर्णरीत्या अभ्यास केला. इंजिनांना गरज असलेल्या तेलाचा प्रमाणित आकडा आणि प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा हिशेब यांमधील फार मोठी तफावत पाहून माझ्या वडिलांना धक्काच बसला. आबांनी यासंबंधी काही संबंधितांशी चर्चा केली. त्यानंतर संबंधितांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांतली एक वजनदार व्यक्ती आबांना भेटली. 'शेकदार, या भानगडीत पडू नकोस. तुझं एक्झिक्युटिव्ह पद व तुझा पगार धोक्यात येऊ शकतो.' आबा मात्र याला बधले नाहीत. त्यांच्या अहवालाची दखल संबंधित उच्चपदस्थांना घ्यावीच लागली. त्यांच्या नोकरीबाबत तांत्रिक मुद्दा आणि उणीव उकरून त्यांना एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर हुद्द्यावरून डेप्युटी इंजिनिअर या कनिष्ठ हुद्द्यावर आणलं. केवळ दोनशे रुपये दरमहा पगारावर त्यांना आणून ठेवलं. पण वडिलांनी माघार घेतली नाही. ' " लग्नानंतरचे थोडे दिवस शशिकलाताई व रावसाहेब श्रीरामपुरातल्या अण्णासाहेबांच्या घरीच राहिले. श्रीरामपूरच्या टेकावडे बिल्डिंगमध्ये रावसाहेबांची तीन खोल्यांची ऑफिससाठीची भाड्याची जागा पूर्वीपासूनच होती. लग्नानंतर पुढे वेगळे बिहाड केले तेव्हा तेथील मागच्या दोन खोल्या त्यांनी निवासासाठी वापरायला सुरुवात केली. सुदैवाने त्यांना शेजारीही उत्तम लाभले गजाननराव दाते, शांतिभाई शाह आणि सुमनभाई शाह. तिन्ही कुटुंबांमध्ये बघता बघता खूप जवळीक निर्माण झाली. जागा लहान असूनही शिंदे पतिपत्नींचे येथील वास्तव्य खूप सुखाचे झाले. १९५७ ते ६६ अशी सलग नऊ वर्षे दोघांनी इथे काढली. तीदेखील लग्नानंतरची अगदी सुरुवातीची वर्षे. एकमेकांना समजून घेण्याची वर्षे. भावी संसाराचा मजबूत पाया घालण्याची वर्षे. त्यांची चारी अपत्ये याच काळात जन्मली. टेकावडे बिल्डिंगमध्ये राहत असतानाही आपले कुटुंब म्हणजे फक्त आपण आणि आपली मुले असा संकुचित विचार शशिकलाताईंनी कधीच केला नाही; सगळ्याच शिंदे कुटुंबाच्या आपण गृहिणी आहोत याचे भान त्यांना होते. वकिलीच्या वाढत्या व्यापामुळे रावसाहेबांना फुरसत अशी अजिबात नव्हती व त्यामुळे स्वत:च्या प्रापंचिक जबाबदाऱ्यांबरोबर गावच्या शेतीची, बाहेरच्या प्रसंगोपात्त कामांची, वृद्ध सासू-सासऱ्यांना सांभाळण्याची, त्यांच्या तसेच आजारात पाटीलभाऊंच्या औषधपाण्याची जबाबदारीही शशिकलाताईंना घ्यावी लागली. अजुनी चालतोची वाट... ३०४ -