पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सासुरवाडी कोल्हापूरची. ते घोरपडे घराणे म्हणजे शाहूमहाराजांच्या सरदारांपैकी एक. महाराजांनी जेव्हा पिलाजीरावांविषयी ऐकले, तेव्हा त्यांनी पिलाजीरावांना कोल्हापूरला बोलावून घेतले. तिथल्या 'पॉवर हाऊस' चे प्रमुख म्हणून. ही १९४६ सालची गोष्ट. १९४६ ते १९५५ अशी सलग नऊ वर्षे, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षापासून सतराव्या वर्षांपर्यंत या खूप संस्कारक्षम वयात, शशिकलाताईंचे वास्तव्य कोल्हापूरला होते. त्यांची बरीचशी वैचारिक जडणघडण याच काळात झाली. पिलाजीरावांना आठ मुले; चार मुलगे, चार मुली. घरी त्यांना आबा म्हणत. नोकरीचा भाग म्हणून त्यांना एक मोठा बंगला मिळाला होता. पंचगंगा नदीच्या तीरालगत, कावळी नाक्याजवळ. त्यांची एक फोर्ड गाडीही होती. आबांनी सर्व मुलांना पंचगंगा नदीत उत्तम पोहायला शिकवले. मुले सायकल तर चालवतच, पण शिवाय मोटार चालवायलाही शिकली. मुलगे आणि मुली असा कुठलाही भेद आबांनी केला नाही. तेरा-चौदाव्या वर्षीच शशिकलाताई फोर्ड गाडी चालवायला शिकल्या. आई विमलाबाई उत्तम गृहिणी होत्या. गोरगरिबांना मदत करायच्या. मोलकरणींना मायेने वागवायच्या. घरात काही चांगला पदार्थ केला तर त्यांनाही आवर्जून द्यायच्या. पाहुणेरा हुणे त्यांना 'अन्नपूर्णा' म्हणत. विमलाबाई घर स्वच्छ व नीटनेटके ठेवायच्या. त्यांना वाचनाची व पत्रलेखनाचीही खूप आवड. त्यांचे मराठी व इंग्रजी अक्षरही उत्तम होते. आबाही पत्नीचा मान राखत. सगळा पगार दरमहा न चुकता तिच्या हाती देत. सर्व घरखर्च विमलाबाईच सांभाळायच्या. पैनपैचा हिशेब व्यवस्थित लिहून ठेवायच्या. पुढील कालखंडाचा विचार करताना जाणवते, की आईचे हे सर्व संस्कार शशिकलाताईंवरही झाले आहेत. वडलांकडून त्यांनी भ्रष्टाचाराविषयीची चीड व कर्तव्यपरायणता घेतली तर आईकडून त्यांनी वाचन प्रेम, सौंदर्यदृष्टी, नीटनेटकेपणा, काटेकोरपणा, मदतशीलता हे गुण घेतले. अशा या कलाप्रेमी, सुसंस्कृत वातावरणात झालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन शशिकलाताई कोयनेला, वडिलांची नोकरी होती त्या गावी, राहायला गेल्या आणि थोड्याच दिवसांनी कोयना मुक्कामीच त्यांचा रावसाहेबांबरोबर साखरपुडा झाला. २५ मे १९५७ रोजी कोल्हापूरला उभयतांचा विवाहही झाला. पिलाजीराव शेकदार ऊर्फ आबा यांच्याबद्दल एक मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा. तो म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा व त्यासाठी किंमत चुकवायची मनाची जिद्द. हा मुद्दा महत्त्वाचा अशासाठी, की शशिकलाबाईंवरचा तो एक महत्त्वाचा संस्कार होता. त्याबाबत शशिकलाताई म्हणतात : "कोयनेला त्या काळात जी मशिनरी होती त्यावर आबा काम करत होते. ती शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ... ३०३