पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिथेच दीड तास ताटकळत होता. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर रावसाहेबांची नुकतीच नेमणूक झाली होती व त्यांचा इतका दरारा होता, की घरात प्रवेश करायचे धाडसच त्या बिचाऱ्या लेखनिकाकडून झाले नाही. त्याचे बोलणे ऐकून शशिकलाताईंना वाईट वाटले. त्या म्हणाल्या, "इतका वेळ उगाच वाट बघितलीत. तुमचा किती वेळ फुकट : गेला! मला आत निरोप तरी द्यायचा. साहेब तर कालच बाहेरगावी गेले आहेत, आता एकदम उद्या परत येतील. तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजता या, म्हणजे ते नक्की भेटतील." त्यांचे आभार मानून तो लेखनिक गेला. शशिकलाताई घरात परतल्या. पण आपल्या त्या एका छोट्याशा सौजन्यपूर्ण कृतीने त्यांनी त्या तरुणाच्या मनात जो जिव्हाळा निर्माण केला, तो आज ३८ वर्षांनंतरही टिकून आहे. तो तरुण म्हणजे सुकदेव सुकळे. जे संस्थेतून निवृत्त झाल्यावरही रावसाहेबांचे व्यक्तिगत सचिव म्हणून सुरुवातीला अनेक वर्षे विनावेतन आणि गेली काही वर्षे अत्यंत अल्प वेतनावर काम करत आहेत. शशिकलाताईंना तर ते मम्मीच म्हणतात. अशी अंतरीच्या जिव्हाळ्याने जोडली गेलेली नाती कधीकधी रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक टिकतात. आणि ती जोडण्यासाठी तुम्हांला खूप काही करायला लागते असेही नाही; साधी माणुसकी, थोडीशी संवेदनक्षमता पुरेशी असते. आजही आपल्या देशातल्या अगणित छोट्या-मोठ्या व्हीआयपींच्या घरापुढे वा कार्यालयापुढे माणसांचे थवेच्या थवे कसे तासन्तास ताटकळत बसलेले असतात हे डोळ्यांपुढे आणले आणि ३८ वर्षांपूर्वीच्या विषमतेने ग्रासलेल्या आपल्या ग्रामीण समाजरचनेत ह्या 'साहेबांची वाट बघण्याचे प्रमाण किती अधिक असेल त्याची कल्पना केली, की शशिकलाताईंच्या त्या अगदी छोट्या पण संवेदनशील पुढाकाराचे महत्त्व लक्षात येते. शशिकलाताईंचे वडील पिलाजीराव विनायकराव शेकदार. इंजिनिअरिंगचे शिक्षण देणाऱ्या देशातील त्यावेळच्या सर्वोत्कृष्ट संस्थेमधून, म्हणजे मुंबईतील माटुंग्याच्या व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट (V. J. T.I.) मधून, त्यांनी स्कॉलरशिपवर शिक्षण घेतले. इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली एल.इ.इ. ही पदविका प्राप्त केली. त्या काळात या शाखेत पदवी शिक्षण नव्हते. लगेच त्यांना जी. आय. पी. म्हणजे आजच्या मध्य रेल्वेत नोकरी लागली. रेल्वेतली नोकरी म्हणजे सारख्या बदल्या. त्यांचे लोणावळ्याला पोस्टिंग असताना तिथल्याच रेल्वे क्वार्टर्समध्ये २१ मे १९३८ रोजी शशिकलाताईंचा जन्म झाला. वडलांची अजुनी चालतोची वाट... ३०२