पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ शशिकलाताई : हे देणे भगवंताचे आयुष्यात नावलौकिक मिळवलेल्या इतर अनेक श्रेष्ठ पुरुषांप्रमाणे रावसाहेब शिंदे यांच्या यशातही त्यांच्या पत्नी सौ. शशिकलाताई शिंदे यांचा, खूपदा नोंद न घेतलेला पण अगदी सिंहाचा म्हणता येईल असा, वाटा आहे. 'सहतेचरामि' हे व्रत अगदी मनोभावे जोपासलेल्या शशिकलाताईंचे व्यक्तिमत्त्व व एकूण जीवन समजून घेतल्याशिवाय रावसाहेबांच्या जीवनाचे आपले आकलन खूप अधुरेच राहील इतके या पती-पत्नींचे जीवन एकरूप झालेले आहे. शशिकलाताईंच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणाऱ्या एका छोट्याशा प्रसंगापासून सुरुवात करावीशी वाटते. सन होते १९७६. स्थळ श्रीरामपूर येथील महादेव मळा हे रावसाहेबांचे निवासस्थान. वेळ सकाळी साडेनऊची. सगळीकडे रणरणरते उन्ह. आवारातल्या पिंपळाखाली तेवढी थोडीफार सावली. त्या झाडाखाली पारावर एक तरुण बसलेला. हातात काही कागदपत्रे. नजर बंगल्याच्या दारावर खिळलेली. ते कधी उघडते व साहेब कधी बाहेर येतात याची वाट पाहत. अर्धा तास झाला, एक तास गेला, दीड तास उलटला; पण साहेबांचा पत्ता नाही. केव्हातरी अचानक घरातल्या शशिकलाताईंचे त्याच्याकडे लक्ष गेले. दोघांची नजरानजर झाली. त्यांना बघून तो उठला. पण बाकी हालचाल काहीच नाही. तो घरात यायची काही सेकंद शशिकलाताईंनी वाट बघितली. पण तो तिथेच उभा राहिला. जरा वेळाने दार उघडून शशिकलाताई स्वत:च बाहेर आल्या. डोक्यावर पदर, हातात कुठलेतरी पुस्तक. पाराजवळ जाऊन त्यांनी त्या तरुणाची आपुलकीने चौकशी केली. रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयातला तो एक लेखनिक होता व हातातली कागदपत्रे रावसाहेबांना दाखवण्यासाठी व त्यांवर त्यांची सही घेण्यासाठी कॉलेजतर्फे आला होता. ते बंगल्याबाहेर आले, की त्यांना कागद दाखवावेत, या विचाराने शशिकलाताई : हे देणे भगवंताचे ... ३०१