पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/३००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुटली; नाहीतर आमच्या समाजात सगळेच पिणारे ! दारू सुटल्यामुळे माझ्या हातात चार पैसे राहू लागले. शेती करताकरता मी गाई- म्हशी विकायचा व्यवसाय करू लागलो. एकदा म्हैस घेण्याकरिता साहेबांनी मला पैसे दिले. मी म्हैस घेतलीदेखील. पण दुर्दैवाने ती मेली. आता साहेबांचे पैसे कसे फेडायचे याची चिंता मला लागून राहिली. पण साहेबांनी 'मला ते पैसे परत नको' असं सांगितलं. मी एकदम सुटकेचा निःश्वास सोडला. एकप्रकारे साहेब माझे पालकच बनले. मध्ये एकदा मी खूप आजारी पडलो तेव्हा साहेबांनी मला साखर कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. हजारो रुपये खर्च आला, पण तो सगळा साहेबांनीच केला. अशी माणुसकी मी पूर्वी कधीच बघितली नव्हती. पुढे माझी मुलंही मोठी झाली. साहेबांच्या सल्ल्यानुसार मी त्यांना रयतच्या शाळेतच शिकवलं. आता माझा एक मुलगा आर.टी.ओ. आहे. दुसरा बोरावके कॉलेजात आहे. दोघेही भाऊ पोलिसात आहेत. साहेबांनी मला व माझ्यामार्फत आमच्या सगळ्या कुटुंबालाच माणसांत आणलं." आपल्या सामाजिक कर्तव्याचा एक भाग म्हणून, या समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतून आपल्या वकिलीपर्वात रावसाहेबांनी सामाजिक कामात समर्पित वृत्तीने भाग घेतला. परंतु एखादी संस्था कायमस्वरूपी स्वतःच्या ताब्यात ठेवणे, त्यातून स्वार्थ साधत राहणे, स्वतःची अशी एक 'प्रतिमा' समाजात निर्माण करणे, त्याचा फायदा घेऊन स्वतः सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणे असले काही मात्र रावसाहेबांनी केले नाही. 'स्वयम् न खादन्ति फलानि वृक्ष: ' याच भावनेतून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला आणि हे सामाजिक ऋणानुबंध जोपासतानाच त्यांचेही अंतरंग कृतार्थतेच्या भावनेने उजळत गेले. रावसाहेबांची वकिली हे एक बहरून आलेले झाड होते; पण 'माझ्याचसाठी फुललो नसे मी' याचे भान त्या झाडाने सतत ठेवले. म्हणूनच असंख्य पांथस्थांना त्या झाडाने सावली दिली, निवारा पुरवला. अजुनी चालतोची वाट... ३००