पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झालेले. समाजकार्याची मनीषा बाळगणारे विद्यार्थिदशेत फारसे काही करणे प्रत्यक्षात शक्य झाले नाही; पण पुढे सुदैवाने रयतमध्येच शिक्षक म्हणून नोकरी मिळाली व रावसाहेबांना अधिक जवळून पाहण्याची संधी मिळाली. आता मात्र आपल्या सामाजिक बांधिलकीला प्रत्यक्ष रूप द्यायचा त्यांनी निर्धार केला व त्यासाठी 'मानवी कल्याण सेवाभावी संस्था स्थापन केली. दहा जून हा रावसाहेबांचा वाढदिवस श्रीरामपुरात अनेक जण 'सद्भावना दिन' म्हणून साजरा करतात; 'सत्काराऐवजी सत्कार्य करा' या रावसाहेबांच्या आवाहनातून ही प्रथा सुरू झाली. पण केवळ एक दिवस साजरा करण्याऐवजी साळवे यांनी १ जून ते ९ जून या कालावधीतील निवडक सात दिवस 'मानवता सप्ताह' साजरा करायला सुरुवात केली. या कालावधीत विविध सेवाउपक्रम राबवले जातात. त्यांच्यातील वैविध्य थक्क करणारे आहे. अंधश्रद्धानिर्मूलन, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, शेतकरी मेळावे, बेरोजगार मार्गदर्शन, महिला सबलीकरण, स्त्री भ्रूणहत्याविरोधी जनजागृती, सर्वधर्मीय भजनस्पर्धा, रक्तदान शिबिर, हृदयरोग तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारखे असंख्य उपक्रम या सात दिवसांत साळवी रोज कुठेनाकुठे राबवत असतात. पूर्वी हे उपक्रम फक्त श्रीरामपुरात व्हायचे, आता संपूर्ण नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होतात. गेली बारा वर्षे हा मानवता सप्ताह सुरू आहे व विशेष म्हणजे त्यात साळवे यांना मदत करणारा सुमारे चाळीस तरुणांचा एक प्रभावी गटच श्रीरामपुरात तयार झाला आहे. खऱ्याखुऱ्या सामाजिक बांधिलकीचा दिवा अंतःकरणात एकदा पेटला, की त्याच्या प्रकाशात एखादा कल्पक व हिकमती तरुण किती लांबची वाटचाल करू शकतो याचे सुनील साळवे हे एक उत्तम उदाहरण आहे. समाजासाठी उपक्रमांच्या स्वरूपात काहीतरी करणे हा विधायकतेचा एक भाग झाला; तो महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही, पण एखाद्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येणे हेदेखील खूप महत्त्वाचे असते. कारण शेवटी समाज हा व्यक्ती व्यक्तींचाच बनलेला असतो आणि व्यक्तिगत परिवर्तन व सामाजिक परिवर्तन ही परस्परपूरकच असतात. त्यासंदर्भात गंगाराम पवार हा एक भटक्या समाजातला माणूस रावसाहेबांच्या सहवासामुळे आयुष्यात कसा स्थिर झाला याची कहाणी त्याच्याच तोंडून ऐकणे हा एक अविस्मरणीय योग होता. हा बेलदार समाज मूळचा राजस्तानातला. त्यातले गंगाराम पवार एक. उंचपुरे, रुबाबदार. पोटासाठी भटकत भटकत अहमदनगर जिल्ह्यात आले. ते म्हणतात, "साहेबांनी मला त्यांच्या भोकर येथील शेतात व नंतर बेलापूर येथील शेतात काम दिलं. त्यांचं शेतावरचं घरही त्यांनी मला राहावयास दिलं. माझ्या आयुष्यातील हे पहिलंच घर. त्यापूर्वी जिथे काम मिळेल तिथे आमची भटकंती सुरू असायची; साहेबांच्या सहवासात आल्यावर माझी दारू एका पालावरून दुसऱ्या पालावर. माझ्याचसाठी फुललो नसे मी २९९ ...