पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मागून येतच होते. देवळात अंधार होता; गाभाऱ्यात फक्त एक मिणमिणती समई होती. देवळाला मोठे, चौकोनी लाकडी खांब होते; धारदार कडा असलेले. पळतापळता रावसाहेबांचे कपाळ त्यातल्याच एका खांबाच्या कडेवर आदळले. जोराची खोक पडली आणि रक्त वाहू लागले. त्यांच्या पाठीमागे उभे असल्याने दादांच्या ते लगेच लक्षात आले नाही. संतापाने त्यांनी रावसाहेबांच्या पाठीत एक जोराचा धपाटा घातला. खांबाच्या धडकेने रावसाहेब आधीच कळवळले होते; या धपाट्याने ते आणखीच विव्हळले. एकदम त्यांना भोवळ आल्यासारखे झाले. तेवढ्यात कपाळावरून भळाभळा वाहणारे रक्त गाभाऱ्यातून येणाऱ्या अंधूक उजेडात दादांना दिसले. गलबलून त्यांनी मुलाला जवळ घेतले. जरा वेळाने रावसाहेब शांत झाले. पण त्यावेळी झालेल्या त्या जखमेचा व्रण आजही रावसाहेबांच्या कपाळावर डाव्या बाजूला आहे. अंगावर एखादी ठळक निशाणी आहे का हे कधीकधी विचारले जाते, त्यावेळी रावसाहेब कपाळावरच्या त्या निशाणीचा उल्लेख करतात. पण त्याचबरोबर बाळ्याला आपण मारले ती चूक केली आणि कुठल्याही कारणावरून दुसऱ्याला असे मारणे हे गैरच आहे, हा धडाही रावसाहेबांच्या मनावर त्या प्रसंगामुळे कायम कोरला गेला. हाही एक नैतिक संस्कारच होता. ग्रामीण भागात त्याकाळी जत्रा हे करमणुकीचे एक मोठेच साधन होते. खुद्द पाडळी गावात अशी कुठली जत्रा भरत नसे, पण आसपासच्या गावी अशा जत्रा भरत व इतरांबरोबर रावसाहेबही तिथे जात असत. यांतली सगळ्यात मोठी जत्रा असायची ती भोजापूरची जत्रा. पाडळीपासून सहा मैलांवरचे हे गाव. रस्ता डोंगराडोंगरातून जाणारा; म्हणजे दुर्गमच. पण गावातले झाडून सगळे लोक त्या जत्रेला जायचे. केवळ पाडळीतलेच नव्हे, तर आसपासच्या दहा-वीस गावांतलेही. गुढीपाडवा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी इथली जत्रा सुरू व्हायची. ही जत्रा म्हणजे पीराचा संदल (उरूस) असायचा. खरा हा मुसलमानांचा उत्सव, पण हिंदूही त्यात उत्साहाने सामील होत. किंबहुना मुसलमानांपेक्षा हिंदूंचीच संख्या जत्रेत जास्त असे. त्याकाळी ग्रामीण भागातील हिंदू-मुसलमानांमध्ये किती सलोख्याचे वातावरण होते याचे हे एक उत्तम द्योतक होते. जत्रेत किराणा मालाची, मिठाईची, संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली जायची. त्या निमित्ताने बाजारहाटाचीही संधी मिळत असे. भोजापूरला लागूनच असलेल्या सोनेवाडी या गावी रावसाहेबांची एक मावशी राहायची. दोन-तीन दिवस तिच्याकडेच मुक्काम असायचा. या जत्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे रात्री आकाशात उडवली जाणारी शोभेची दारू. नगर-नाशिक भागात फक्त याच जत्रेत हे दारुकाम होई. रात्री तीन-चार तास हे पाडळीतल्या पाऊलखुणा... २९