पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुमारे चार एकर जमीनही देणगीदाखल दिली आहे. एक आदर्श म्हणता येईल अशी शाळा तिथे उभी राहिली आहे व तिच्या विस्ताराचे काम सध्या सुरू आहे. 'It is better to set ten men to work rather than do the work of ten men' ('स्वत:च दहा जणांचे काम करण्यापेक्षा दहा जणांना कामाला लावणे अधिक चांगले') असे म्हणतात. रावसाहेबांनीही अनेक माणसे अशीच स्वतःच्या पायावर उभी केली; त्यांना सामाजिक कामासाठी प्रेरित केले. वानगीदाखल त्यांतील दोघा-तिघांबद्दल लिहिण्यासारखे आहे. गंगाधर पाटील चौधरी हे राहाता तालुक्यातील जळगाव गावचे एक शेतकरी कार्यकर्ते. गावाची लोकवस्ती सात-आठशे आहे. इथे दारूचे व्यसन खूप बोकाळले होते. श्रीरामपुरातील रयत संकुलात विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) राबवण्यावर खूप भर होता. स्वतः रावसाहेबही त्यात लक्ष घालत. दरवर्षी हिवाळ्यात वेगवेगळ्या गावांमध्ये एनएसएसची शिबिरे होत. जळगावात रावसाहेबांनी एकदा शिबिर घेतले. स्वतः रावसाहेब तिथे हजर होते. त्यांच्या भाषणाचा गावकऱ्यांवर खूप परिणाम झाला. पुढील तीन-चार वर्षे विद्यार्थी आणि गावकरी यांचा समन्वय रावसाहेबांनी कायम राखला. या उपक्रमात गंगाधर पाटलांनी, तसेच भाऊसाहेब चौधरी व इतर सहकाऱ्यांनी स्वतःला झोकून दिले. आज गावात दारूचे एकही दुकान नाही व गाव जवळजवळ पूर्णतः दारूमुक्त आहे. त्याचीच एक फलश्रुती म्हणजे लोकांमधला कर्जबाजारीपणाही जवळपास संपुष्टात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व गावकऱ्यांना पटवून द्यायला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्येक घरात संडास बांधला व विशेष म्हणजे प्रत्येक घरात पाण्याचीही सोय करून दिली. त्यासाठी गावतळी आणि विहिरी स्वच्छ केल्या. आज गावात एकही माणूस बाहेर शौचाला बसत नाही. गावातली शेतीही सुधारली. द्राक्ष, बटाटा व कांदा ही पिके मुबलक निघतात. काही शेतकऱ्यांनी पॉलिहाउसही उभारले आहे. चांगल्या शेतीमुळे सोसायटीचे बँकेचे कर्जही वेळेत फेडले जाते. गेल्या दहा वर्षांत गावात एकही पोलीस केस नाही. तंटामुक्त गाव, हरित ग्राम, निर्मल ग्राम इत्यादी अनेक शासकीय पुरस्कार गावाने मिळवले आहेत. गंगाधर पाटील म्हणतात, "या कामात रावसाहेबांची प्रेरणा व मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आमचे गाव कधी कुठे झळकत नाही, पण अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी किंवा पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार यांच्याप्रमाणे आमचे गावही उत्तम आहे, आदर्श आहे." एनएसएससारख्या योजना तशा देशभर सर्वत्र चालूच असतात, पण त्यात जेव्हा एखादा संस्थाप्रमुख व्यक्तिशः आस्था दाखवतो तेव्हा किती दूरगामी परिणाम होऊ शकतो हे या उदाहरणातून अधोरेखित होते. सुनील साळवे हे मला श्रीरामपुरात त्या दिवशी भेटलेले दुसरे एक प्रेरणादायी तरुण. रयतचेच विद्यार्थी विद्यार्थिदशेतच रावसाहेबांच्या भाषणांनी प्रभावित अजुनी चालतोची वाट... २९८