पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुर्दैवाने महाराष्ट्राने मात्र दादांच्या अलौकिक कार्याची नीटशी दखल घेतली नाही. जून २००६ मध्ये दादांनी या जगाचा निरोप घेतला. म्हणजे रावसाहेबांना त्यांचा प्रदीर्घ सहवास लाभला असे म्हणता येणार नाही. पण तरीही तुकारामदादांच्या सहवासातले क्षण हे रावसाहेबांना खूप मोलाचे वाटतात. इंडियन लॉ सोसायटीच्या कामातील सहभाग हाही रावसाहेबांच्या सामाजिक कामातील एक महत्त्वाचा घटक आहे. पुण्याच्या लॉ कॉलेज रोडवर विस्तीर्ण आवारात पसरलेले लॉ कॉलेज हा पुण्याचा एक मानबिंदू आहे. हे कॉलेज याच सोसायटीच्या मालकीचे. आपले वकिलीचे शिक्षण रावसाहेबांनी याच कॉलेजातून १९५१ ते १९५३ या कालावधीत पूर्ण केले, इथल्याच हॉस्टेलमध्ये ते राहतही होते. कॉलेजच्या बहुतेक उपक्रमांत त्यांचा सहभाग असायचाच. त्यानिमित्ताने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांचा संपर्क येत गेला. त्याचीच परिणती ते सोसायटीच्या जनरल बॉडीचे सदस्य होण्यात झाली. पुढे ते गव्हर्निंग कौन्सिलचेही सदस्य बनले व १९९८मध्ये सोसायटीचे व्हाइस प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड झाली. २००८ साली सोसायटीचे प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड झाली. ज्या कॉलेजात आपण एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो तेच कॉलेज चालवणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड होणे हा स्वाभाविकच रावसाहेबांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता. पण त्याचबरोबर या सन्मानाला आपण खरोखरच पात्र आहोत का याविषयीची शंकाही त्यांच्या मनात होती. कारण यापूर्वी न्या. नारायणराव चंदावरकर, न्या. एच. सी. कोयाजी, न्या. मुकुंदराव जयकर, रँग्लर र. पु. परांजपे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर व यशवंतराव चंद्रचूड यांच्यासारख्या दिग्गजांनी हे पद भूषविले होते. आपल्या मनातील शंका त्यांनी इतर सहकाऱ्यांपाशी व्यक्त केली. ज्या बैठकीत त्यांची निवड झाली त्या बैठकीला ते हजरही नव्हते. परंतु ही निवड सर्व उपस्थितांनी एकमताने केली होती व रावसाहेबांनीच हे पद स्वीकारावे हा त्यांचा आग्रह नंतरही कायमच राहिला. त्यामुळे मग शेवटी रावसाहेबांनी होकार कळवला. संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे सुरू आहे. रावसाहेब म्हणतात, " या संस्थेत वर्षानुवर्षे मला कोणत्याही तऱ्हेचा सत्तासंघर्ष दिसून आलेला नाही. विविध क्षेत्रांतल्या व्यक्ती अतिशय समजूतदारपणाने व शहाणपणाने या संस्थेच्या कामकाजात भाग घेतात. निरनिराळी मते चर्चेत असतात, तथापि सर्व निर्णय एकोप्याने घेतले जातात. बहुतेक उच्चशिक्षित, विचारी आणि किमान सांस्कृतिक पातळी असणाऱ्या व्यक्तींचाच संस्थेत समावेश आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पै-पावआण्याचाही स्वार्थ साधण्याचे कोणतेही कृत्य अगदी अपवादात्मकदेखील कधी दिसून येत नाही." माजी प्राचार्य जी. व्ही. पंडित यांच्या कन्या डॉ. वैजयंती जोशी सध्या कॉलेजच्या प्राचार्या व संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत व त्यांना सर्व अजुनी चालतोची वाट... २९६