पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

केले! कोणालाच खरे वाटणार नाही अशी ही घटना आहे. यावरचे शिवशंकरभाऊंचे स्पष्टीकरण असे : "आमची गरज सगळी मिळून सत्तर कोटींचीच होती. याहून जास्त रकमेचा योग्य तो विनियोग आम्ही करूही शकलो नसतो. अतिरिक्त पैसा अनीतीला व भ्रष्टाचाराला उत्तेजन देतो. मला ते कुठल्याही परिस्थितीत नको होते. उगाच जास्त पैसा काय कामाचा? आम्ही सरळ सहाशे तीस कोटीचे फंडिंग नाकारायचा निर्णय घेतला." असे हे शिवशंकरभाऊ. एक अगदी जगावेगळे व्यक्तिमत्त्व. शिवशंकर भाऊंच्यामुळे रावसाहेबांचा गीताचार्य तुकारामदादा यांच्याशी ऋणानुबंध जडला. त्यावेळी दादा नव्वदीच्या घरात होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी ही दादांची कर्मभूमी. दादांना अठरा भाषा अवगत होत्या. तुकडोजी महाराजांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले होते. ते एकपाठी होते व अवघ्या एका दिवसात त्यांनी संपूर्ण गीता मुखोद्गत केली असे म्हटले जाते. गांधीजींनी त्यांना गीताचार्य ही उपाधी दिली. त्या परिसरातील पन्नास-साठ गावांमध्ये त्यांनी ग्रामसभा कार्यान्वित केल्या. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती या सर्वच क्षेत्रांतील त्यांचे कार्य अलौकिक म्हणता येईल असेच आहे. आनंदवनात डॉ. दिगंत आमटे यांचा विवाहसमारंभ आटोपल्यावर शिवशंकरभाऊ व रावसाहेब सहकुटुंब अड्याळ टेकडीला गेले. मोटारने चांगला पाच-सहा तासांचा प्रवास. त्या पहिल्याच भेटीने रावसाहेब भारावून गेले. तेथील भगिनींनी पाहुण्यांचे पाय धुऊन त्यांचे स्वागत करायची प्रथा मात्र रावसाहेबांना खटकली. दुस-या दिवशी ग्रामसभेत रावसाहेबांनी तो विषय काढला. बरीच चर्चा झाली आणि कौतुकाची बाब म्हणजे रावसाहेबांचे म्हणणे सगळ्यांना पटले व वर्षानुवर्षे चालत आलेली ती प्रथा बंद करायचा निर्णय ग्रामसभेने एकमताने घेतला. औषधी वनस्पतींवरचे दादांचे संशोधनही रावसाहेबांना अद्भुत वाटले. दादांनी एका वनस्पतींची पाने दाखवली. ती पाने दोन दिवस पाण्यात भिजत ठेवून ते पाणी प्याले, की पुढचे तीन दिवस भूक किंवा तहान अजिबात लागत नाही. दुसन्या एका वनस्पतीचे पान दादांनी दाखवले. त्याच्या देठातला चीकही त्यांनी बाहेर काढला. त्या चिकाचा एक थेंब जरी दुधात टाकला तरी त्याच क्षणी त्या दुधाचे दही बनते. गुडघेदुखीवर, महिलांच्या मासिक पाळीतल्या तक्रारींवर, कुठल्याही प्रकारच्या फ्रॅक्चरवर (अस्थिभंगावर) रामबाण उपाय ठरतील अशा वनस्पती दादांनी दाखवल्या. इथल्या गावकऱ्यांना डॉक्टरकडे जायची सहसा कधीच वेळ येत नाही असे दादांचे म्हणणे. हे सर्व पारंपरिक ज्ञान शास्त्रीय पद्धतीने नोंदले गेले पाहिजे व वैद्यकशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्याचा समावेश कसा होईल ते पाहिले पाहिजे. भारताने जगाला दिलेली ती एक महत्त्वाची देणगी ठरू शकेल. दादांच्या ग्रामस्वराज्याची कीर्ती ऐकून आंध्रचे चंद्राबाबू नायडू व मध्यप्रदेशचे दिग्विजयसिंग हे दोन तत्कालीन मुख्यमंत्री मुद्दाम अड्याळ टेकडीला येऊन गेले. माझ्याचसाठी फुललो नसे मी... २९५