पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाबांचा जितके दिवस मुक्काम असे तितके दिवस हा उपक्रम असे. शिंदे कुटुंबात राहणे बाबांना इतके आवडायचे, की एकदा तर बाबा स्वतःच्या कुटुंबीयांची नाराजी स्वीकारून दिवाळीच्या सणालाही महादेव मळ्यात येऊन राहिले. त्यांनी शिंदे कुटुंबीयांची गणना एकप्रकारे आप्तस्वकीयांतच केली. याचे बव्हंशी श्रेय रावसाहेब पत्नीला देतात. पुढे बाबांच्या निधनानंतर रावसाहेबांचे आनंदवनात जाणे कमी-कमी होत गेले पण त्यांच्या एकूण आयुष्याचा आनंदवनपर्व हा एक महत्त्वाचा भाग आहे यात शंकाच नाही. रावसाहेबांच्या सामाजिक ऋणानुबंधांमध्ये शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे प्रमुख शिवशंकर पाटील ऊर्फ भाऊ यांचेही स्थान खूप मोलाचे आहे. शेगाव येथील संस्थानाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, आरोग्य विभाग, मतिमंदांची शाळा व सुमारे तीनशे एकरांवर पसरलेला आनंदसागर जलाशयाचा विशाल प्रकल्प हे सारे थक्क करणारे आहे. घरची दोन-अडीच हजार एकर शेती असलेले शिवशंकरभाऊ धोतर, सदरा, टोपी या साध्या शेतकरी पोषाखातच शेगावच्या परिसरात अहोरात्र फिरत असतात. सर्व व्यवस्था जातीने पाहत असतात. एवढा प्रचंड कारभार, पण सगळे अगदी शांतपणे चाललेले असते. वादविवाद नाही, गाजावाजा नाही, कोणी कोणाला हुकूम सोडणे नाही. त्यांच्याकडे बघितल्यावर इथली ही प्रमुख व्यक्ती आहे याची कल्पनाही कोणाला येणार नाही. त्यांच्या कार्याविषयी लिहावे तेवढे थोडेच होईल. बाबा आमटे यांना बरोबर घेऊनही रावसाहेबांनी शेगावला तीन-चार वेळा मुक्काम केला आहे. यातली विशेष गोष्ट म्हणजे अशा धार्मिक स्थळी बाबा सहसा कधी जात नसत. पण रावसाहेबांनी त्यांचे शेगावशी नाते जोडून दिले. सोमनाथ येथील श्रमसंस्कार शिबिराला शिवशंकरभाऊ आपले विद्यार्थी पाठवतातच, पण शिवाय दरवर्षी शिबिराला भरीव देणगीही देतात. चांगल्या कामात स्वतः सहभागी होणे महत्त्वाचे असतेच, पण दोन चांगल्या कामांचे परस्परांशी थेट नाते जोडून देणे हेही खूप महत्त्वाचे आहे. रावसाहेब हे काम नेहमी करत असतात. इंग्रजीत ज्याला ब्रिज-बिल्डिंग ('सेतुबंधन') म्हणतात ते हे काम खूप नि:स्वार्थी माणसेच करू शकतात; एरवी बहुतेकांचा कल स्वत:चे 'कॉन्टॅक्ट्स' स्वतःसाठीच जपून ठेवण्याकडे असतो. शिवशंकरभाऊंचा एक अनुभव तर अगदी अविश्वसनीय वाटावा असाच आहे. अमेरिकेत सिटी बँकेचे चेअरमन राहिलेले विक्रम पंडित हे मूळ याच परिसरातले. शिवशंकरभाऊंच्या विविध आरोग्यविषयक योजनांसाठी देणगी म्हणून त्यांनी सातशे कोटी (होय, ७०० कोटी रुपये देऊ केले होते. पण त्यातले फक्त सत्तर कोटी शिवशंकरभाऊंनी स्वीकारले व बाकीचे सहाशे तीस कोटी चक्क परत अजुनी चालतोची वाट... २९४