पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्तव्यच आहे ही जाणीव त्यातून अनेकांच्या मनात रुजली, 'देण्यातला आनंद' अनेकांना मिळवता आला ही सारी जमेची अधिक मोठी बाजू आहे. आनंदवनाच्या कार्यक्रमातील सहभागाबरोबरच आमटे परिवार व रावसाहेब शिंदे यांचा परिवार यांच्यातही जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. मध्यंतरी नर्मदा आंदालनासाठी बाबांनी आनंदवन सोडले होते - 'पुन्हा कधीच मी इथे परतणार नाही,' असा जाहीर निश्चय करूनच. मध्यप्रदेशात नर्मदातीरी छोटा कसरावद या गावी जाऊन ते राहिले. साधनाताई त्यांच्याबरोबर होत्या. तिथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बाबांनी 'लोकबिरादरी' हा प्रकल्प उभारला. त्यांनी आनंदवनात परत यावे अशी डॉ. विकास व अन्य आमटे कुटुंबीयांची तीव्र इच्छा होती. पण बाबांचा निश्चय ढळला नाही. बघताबघता नऊ वर्षे उलटली. एक दिवस डॉ. विकास यांनी रावसाहेबांपाशी हा विषय काढला. म्हणाले, "बाबा आमचे ऐकत नाहीएत. ऐकलं, तर एकवेळ तुमचंच ते ऐकतील. तुम्ही त्यांना सांगून बघाल का?” ते असे म्हणाले याचे कारण खूपदा रावसाहेबांनी आग्रह केला तरच बाबा औषध घ्यायचे. त्यानुसार रावसाहेब उरळी कांचनचे बापू कांचन व राजाभाऊ मंगळवेढेकर यांच्यासह कसरावादला गेले. आनंदवनात परतायची त्यांनी बाबांना गळ घातली. 'पुल आनंदवनात येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी तरी तुम्ही तिथे असायला हवेत' असेही रावसाहेब म्हणाले. ही मात्रा नेमकी लागू पडली आणि बाबा एकदाचे आनंदवनात परतले ! नऊ वर्षांनंतर ! बाबांनी एकूण चार वेळा श्रीरामपुरात येऊन महादेव मळ्यात वास्तव्य केले. त्यावेळी शिंदे परिवाराच्या आतिथ्यशीलतेची कसोटी पाहणारे प्रसंगही कधीकधी उद्भवत. त्यांच्याबरोबर त्यांच्या मोठ्या बसमध्ये सुमारे पाच-सहा जण मदतनीस असत. बाबांच्या माणसांच्यासाठी त्यांच्या बसमध्ये स्वयंपाकाचे साहित्य, गॅस, सर्व शिधासामग्री असायची. अशाच एका भेटीत बाबा, साधनाताई घरात आल्या. बाहेर थांबलेल्या बाबांच्या माणसांनी विचारले, "आम्हांला आमच्यासाठी स्वयंपाक करण्याची जागा कोणती ती सांगाल का?” शशिकलाताई बाहेर जाऊन त्या सर्वांना स्पष्ट आवाजात म्हणाल्या, "बाबांच्याबरोबर तुम्हीदेखील आमचे पाहुणे आहात. आमच्या घरीच तुम्ही जेवायचं आहे. तुम्ही वेगळा स्वयंपाक मुळीच करायचा नाही. तुमचं सगळं स्वयंपाकाचं सामान गाडीत परत ठेवून द्या." त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत त्या सर्वांचाच मुक्काम महादेव मळ्यात पाहिजे तेवढे दिवस अतिशय आनंदात व्हायचा. बाबा आले म्हणजे साहजिकच सकाळ-संध्याकाळ त्यांना भेटण्यासाठी सारखी माणसांची रांग सुरू असायची. शशिकलाताईंचा कटाक्ष होता, की आलेल्या कोणाही व्यक्तीला चहाशिवाय जाऊ द्यायचे नाही. ते दृश्य पाहून बाबा विस्मयाने म्हणाले, "रावसाहेब, शशिताई, इथे काय ट्यूब वेल ऑफ टी आहे की काय?” माझ्याचसाठी फुललो नसे मी २९३