पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रत्यक्ष सहभाग हा दुसरा भागही महत्त्वाचा होता. सोमनाथ येथे आनंदवन परिवारामार्फत होणाऱ्या श्रमसंस्कार शिबिरांना रावसाहेब श्रीरामपुरातील रयतचे विद्यार्थी व प्राध्यापक १९९८ पासून दरवर्षी पाठवू लागले. आनंदवनातील इतरही अनेक उपक्रमांना या विद्यार्थ्यांची व प्राध्यापकांची उपस्थिती असते. गेल्या पंधरा वर्षांतली त्यांची एकूण संख्या काही हजारांच्या घरात सहज जाईल. या सर्वांवर तिथे जे श्रमसंस्कार झाले, समाजसेवेत भाग घेतल्याचे जे समाधान त्यांना मिळाले ते केवळ अमूल्य असेच आहे. प्रा. शरद दुधाट म्हणतात, "सोमनाथच्या श्रमसंस्कार शिबिरात भाग घेणारा मी रयतचा पहिला विद्यार्थी. तिथे जे बघितले त्याने मी अगदी झपाटूनच गेलो. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा आनंदवनात जायला मी सुरुवात केली. पुढे मी रयतमध्येच प्राध्यापक बनलो आणि कॉलेजातल्या विद्यार्थ्यांचे गटही बरोबर नेऊ लागलो. तिथे विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळायची; त्यांचे विचारविश्वच बदलून जायचे. आनंदवनातले अनेक प्रसंग माझ्या स्मरणात कोरले गेले आहेत. उदाहरणार्थ, २००० सालचा एक भव्य आनंदवन मेळावा. पंचवीस विद्यार्थ्यांबरोबर मी त्यात सहभागी झालो होतो. आनंदवन व सोमनाथ उभारताना अनेक वृक्ष अपरिहार्यपणे तोडावे लागले होते. बाबांना त्याबद्दल खूप वाईट वाटे. त्या कळवळ्यातूनच आपल्या निवासस्थानाजवळ त्यांनी एक 'अनाम वृक्षाची स्मरणशिला' तयार करून घेतली. या मेळाव्यात रावसाहेबांच्याच हस्ते त्या स्मरणशिलेचे उद्घाटन करण्यात आले. न भूतो न भविष्यति असाच हा कार्यक्रम झाला. कराव्या लागलेल्या वृक्षतोडीचे परिमार्जन म्हणून बाबांनी असंख्य वृक्ष लावले व जोपासले हा भाग वेगळाच. असाच दुसरा एक संस्मरणीय प्रसंग डिसेंबर २००६मधला. त्यावेळी बाबा ९२ वर्षांचे होते व अंथरुणाला खिळले होते. 'रावसाहेबभाऊ व शशिकलाताई यांच्या हस्ते मला नाश्ता घ्यायचा आहे', अशी इच्छा बाबांनी व्यक्त केली. 'आपल्या हाताने मला उपमा भरवा' असे ते सांगत होते व त्यानुसार त्या दोघांच्याही हातून दोन-दोन चमचे उपमा बाबांनी खाल्ला. नंतर रावसाहेबांना जवळ घेऊन बाबांनी त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरून हात फिरवला. अतिशय हृदयस्पर्शी असाच हा प्रसंग होता. " आपल्याकडे धार्मिक कार्यासाठी दान द्यायची प्रथा पूर्वापार आहे पण एखाद्या सामाजिक कार्यासाठी पैसे द्यायची परंपरा आपल्याकडे फारशी रुजलेली नाही. करुणा आणि दातृत्व (कंपॅशन आणि चॅरिटी) या गुणांना आपल्या भावविश्वात फारसे स्थान नसते. आनंदवनाला यथाशक्ती मदत करण्यासाठी रावसाहेबांनी असंख्य जणांना प्रवृत्त केले व त्यामुळे आनंदवनाला जी मदत झाली असेल ती जमेची केवळ एक बाजू झाली. त्या सहभागामुळे अनेकांच्या मनात करुणा आणि दातृत्व यांची जी रुजुवात झाली, समाजात 'देणारे हात' वाढले, समाजऋण म्हणून एक प्रकार असतो व ते फेडण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे हे आपले अजुनी चालतोची वाट... २९२ ●