पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सत्कार्य' असेच त्यांनी त्याचे नामकरण केले. केवळ विवाहप्रसंगीच नव्हे, तर वाढदिवस, स्मृतिदिन, वास्तुशांती, प्रमोशन अशा वेगवेगळ्या निमित्तांनी होणाऱ्या समारंभांत हे सत्कार केले जात व त्याप्रसंगी केवळ फेटे बांधूनच नव्हे, तर इतरही अनेक प्रकारे सत्कारावर बराच खर्च केवळ जनरूढीचा भाग म्हणून केला जातो. ते पैसे एखाद्या सत्कार्याला दान म्हणून द्यावेत असे रावसाहेबांचे आवाहन होते. तसा मसुदा असलेले एक विशिष्ट पत्रच रावसाहेबांनी तयार केले व त्यांना कुठल्याही समारंभाचे आमंत्रण आले, की हे पत्र ते संबंधितांना पाठवून देत. "समारंभातील निरर्थक खर्चाला फाटा देऊन सामाजिक कार्यात सहभागी होणे कितीतरी अर्थपूर्ण आहे, सत्कारापेक्षा सत्कार्य अधिक मोलाचे," असे पत्रात म्हटले होते. शिवाय शेवटी "आपला धनादेश 'महारोगी सेवा समिती, आनंदवन, वरोरा' या नावे काढावा" असेही स्पष्ट नमूद केले होते. या योजनेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्यातून आनंदवनाकडे थेट बरीच रक्कम जाऊ लागली. या उपक्रमाचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे सत्काराला फाटा देऊन वाचलेले पैसे खूपदा कार्यक्रमातच रावसाहेबांच्या हाती सुपूर्द केले जात व ते स्वीकारताना रावसाहेब एक छोटेसे भाषणही देत. आनंदवनाची महती त्यातून सर्वच उपस्थितांपर्यंत पोचत असे. आनंदवनातील अंध, मूकबधिर, अपंग कलावंतांनी एक ऑर्केस्ट्रा तयार केला होता व 'स्वरानंद' या नावाने त्याचे ठिकठिकाणी प्रयोग केले जात, आजही केले जातात. आनंदवनाच्या कार्याचा प्रसार व्हावा आणि त्यासाठी निधी गोळा व्हावा हा अर्थातच त्यामागचा उद्देश होता. या ऑर्केस्ट्राचे अनेक कार्यक्रम रावसाहेबांनी श्रीरामपूर परिसरात आयोजित केले. या संदर्भातला डॉ. अजेय गर्जे व त्यांच्या कोपरगावातील सहकाऱ्यांचा एक पुढाकार नमूद करण्याजोगा आहे. जून २००२ रोजी, रावसाहेबांच्या वाढदिवशी, सकाळी-सकाळी ही मंडळी श्रीरामपुरात दाखल झाली. वाढदिवसानिमित्त रावसाहेब एरवी कुठचीच भेट स्वीकारणार नाहीत हे त्यांना ठाऊक होते व म्हणून त्यांनी एक आगळीच भेट सोबत नेली होती - आनंदवनासाठी औषधे. त्यांची वर्गवारी व पॅकिंग उत्तम होते. इतके, की आनंदवनात जेव्हा तो खोका पोचला तेव्हा स्वतः बाबांनी त्याच्याशेजारी उभे राहून फोटो काढून घेतला. साधारण पंचवीस-तीस हजारांची ती औषधे होती. तेव्हापासून गेली बारा-तेरा वर्षे दरवर्षीच १० जूनला हे घडत आले आहे. - आनंदवनासाठी रावसाहेबांनी राबवलेल्या विविध उपक्रमांचे बाबांना कौतुक होते व अनेकदा 'श्रीरामपूर पॅटर्न' म्हणून ते त्यांचा जाहीर उल्लेखही करत. आनंदवनाला केलेली मदत हा एक भाग झाला; पण आनंदवनाच्या कामातील माझ्याचसाठी फुललो नसे मी २९१ ...