पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शुभेच्छापत्रे, पादत्राणे, पंचे, नॅपकीन, टॉवेल, सतरंज्या, गाद्या अशा विविध वस्तू बनवतात व त्या विकून संस्थेच्या चरितार्थासाठी पैसे उभारतात. या विक्रीच्या कामात आनंदवन स्नेह परिवाराने मोठा हातभार लावला. त्यासाठी विकास आमटे यांची व्याख्यानेही आयोजित केली. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे स्टॉल उभारून ही विक्री होत असे. एकदा तर फक्त तीन दिवसांत तीन ते चार लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली होती. आनंदवननिर्मित वस्तूंची विक्री हा जसा एक भाग होता तसाच आनंदवनाला उपयुक्त अशा वस्तू त्यांना देणे हा दुसरा भाग होता. त्यासाठी रावसाहेबांनी 'दिवाळी भेट योजना' राबवली. "दिवाळीला आपण नवे कपडे घेतो, मौजमजा करतो; मग त्यावेळी आनंदवनातील बांधवांची आठवण आपण नको का ठेवायला? त्यांनाही दिवाळीचा आनंद उपभोगता यायला हवा की नको?” अशाप्रकारचे आवाहन वेगवेगळ्या प्रसंगी ते करू लागले. विशेषत: विद्यार्थ्यांसमोर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेकांनी फटाके उडवायचे थांबवले वा खूप कमी केले आणि ते पैसे आनंदवनासाठी दिले. रावसाहेबांचे एक स्नेही भास्करराव बोरावके हे शिर्डी येथील साई संस्थानाचे मुख्य विश्वस्त होते. रावसाहेबांपासून प्रेरणा घेऊन एकदा त्यांनी आनंदवनाला उपयुक्त अशा वस्तूंनी पूर्ण भरलेले तीन ट्रक तिथे पाठवून दिले. त्या वस्तूंची किंमत लाख - दोन लाख रुपये सहज असेल. मदत गोळा करण्याचा तिसरा मार्ग म्हणजे 'सत्कारापेक्षा सत्कार्य' हा उपक्रम. एका विवाहसमारंभाच्या प्रसंगी रावसाहेबांना हा उपक्रम सुचला. त्यांचे एक मित्र व श्रीरामपूरचे प्रसिद्ध उद्योजक आबासाहेब फरगडे यांच्या मुलाचा विवाह ठरला. त्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांपैकी दोन-तीनशे ठळक व्यक्तींचा फेटे बांधून सन्मान करावा असा वधूपित्यांचा आग्रह होता. ग्रामीण भागामध्ये ही परंपराच आहे व त्या फेट्यांच • समारंभानंतर काहीच उपयोग होत नाही कळत असूनही केवळ एक परंपरा म्हणून हा फेट्यांचा खर्च केला जातो. पण आबासाहेब पुरोगामी विचारांचे होते. ते पैसे वाचवून काही चांगल्या कामांना देणगी द्यावी अशी आबासाहेबांची इच्छा होती. रावसाहेब आनंदवनासाठी पैसे गोळा करतात हे त्यांनी ऐकले होते. त्यांनी आपली इच्छा रावसाहेबांपाशी व्यक्त केली. रावसाहेबांनाही ती कल्पना आवडली. नंतर आबासाहेब आपल्या भावी व्याह्यांशी बोलले. रावसाहेबांनाही ही कल्पना पसंत असल्याचा त्यांनी उल्लेख केला. व्याह्यांचेही मत मग बदलले व त्यांनी फेट्यांचा आग्रह सोडून दिला. त्यामुळे वाचलेले अकरा हजार रुपये आबासाहेबांनी त्या विवाह सोहळ्यातच रावसाहेबांच्या हाती सुपूर्द केले. हा उपक्रम मग इतरत्र राबवायलाही रावसाहेबांनी सुरुवात केली. 'सत्काराऐवजी अजुनी चालतोची वाट... २९०