पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जिंदगी देनेवाले' अशा शब्दांत रावसाहेबांचा उल्लेख केला. बाबा आमटे यांच्याशी जोडले गेलेले नाते हे रावसाहेबांच्या सामाजिक ऋणानुबंधांतील एक महत्त्वाचे प्रकरण आहे. यदुनाथ थत्ते व राजाभाऊ मंगळवेढेकर हे रावसाहेबांचे अगदी घरगुती संबंध असलेले जवळचे मित्र. बाबा आमटेंविषयी ते खूपदा बोलायचे, साधना साप्ताहिकातून लिहायचेही. बाबा आमटेंची महाराष्ट्राला ओळख करून द्यायचे मोठे श्रेय साधना साप्ताहिकाला व त्यात थत्ते व मंगळवेढेकरांनी आमटेंविषयी केलेल्या विपुल लेखनाला आहे. बाबा पुण्यात आले, की त्यांचा मुक्काम हमखास राजाभाऊंच्या घरीच असायचा. तसे ते एकदा आले असताना राजाभाऊंनी मुद्दाम रावसाहेबांना बोलावून घेतले. रावसाहेब व शशिकलाबाई चिरंजीव राजीवसह लगेच गेले. पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर वगैरे बाबांचे साहित्यक्षेत्रातील चाहते आधीच तिथे पोहोचले होते. पुलंनी 'गुण गाईन आवडी' या पुस्तकात बाबांवर लिहिलेला लेख रावसाहेबांनी नुकताच वाचला होता. १३, १४ व १५ मार्च १९८२ला रावसाहेब राजाभाऊंच्या समवेत आनंदवन मित्र मेळाव्याला आनंदवनात गेले. एस. एम. जोशी प्रमुख पाहुणे होते. आत्तापर्यंत बाबांच्या कार्याविषयी ऐकले होते व वाचले होते; त्यावेळी आनंदवनात ते काम रावसाहेबांना प्रत्यक्ष पाहावयाला मिळाले. बाबा आमटे यांचे काम तसे बहुसंख्य मराठी वाचकांना आज परिचित आहे. त्या कामाच्या प्रत्यक्ष दर्शनाने रावसाहेबांसारखा संवेदनशील माणूस भारावून जाणे अगदी स्वाभाविकच आहे. एकदा एखादे काम मनापासून आवडले, की सर्व शक्तिनिशी त्या कामामागे उभे राहायचे हा रावसाहेबांचा स्वभावच आहे. त्यानुसार रावसाहेबांनी आनंदवनच्या कामाला जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी उचललेले पहिले पाऊल हणजे ५ जुलै १९८२ रोजी श्रीरामपूरच्या लायन्स क्लबमध्ये केलेले भाषण. या भाषणात त्यांनी प्रथमच बाबांच्या कामाची माहिती श्रोत्यांपुढे मांडली. श्रोत्यांच्या प्रतिसाद उत्तम होता. सभागृहातील सगळे वातावरणच एकदम बदलून गेले. या विषयावर बोलायची अनेक आमंत्रणे त्यांना येत गेली आणि मोठ्या उत्साहाने रावसाहेब ती स्वीकारू लागले. भाषणाच्या शेवटी अनेक श्रोते प्रत्यक्ष भेटीसाठी थांबत, आनंदवनासाठी मदत करण्याची इच्छा प्रदर्शित करत. त्यातूनच 'आनंदवन स्नेह परिवार' ही संस्था उभी राहिली. हळूहळू वाढत गेली. 'काम माणसे उभारते, दान माणसाला नादान करते' ही बाबा आमटे यांची भूमिका होती. या दृष्टीने आनंदवनातील महारोगी व इतर रहिवासी स्वहस्ते माझ्याचसाठी फुललो नसे मी ... २८९