पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग आहे. त्यामुळे अन्य समवयस्कांप्रमाणे त्यांच्या बोलण्यात तब्येतीची कुरबूर कधीही नसते. 'शरीरमाद्यम् खलुधर्मसाधनम्' या शास्त्रवचनाची यथार्थता रावसाहेबांकडे पाहिले की लगेच पटते. शारीरिक कष्ट त्याकाळी सगळेच करत होते व त्यामुळे रावसाहेबांनी ते केले यात तसे जगावेगळे काहीच नव्हते. पण ही सर्व कामे त्यांनी मन लावून केली व या कामांतून एक प्रकारचा आनंदही त्यांनी भरपूर घेतला. श्रमसंस्काराचे महत्त्व त्यांच्या मनावर त्यामुळे पुरते बिंबले व भावी आयुष्य एका विशिष्ट पद्धतीने घडवण्यातही या श्रमसंस्काराचा मोठा वाटा होता. महात्मा गांधी आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांचा रावसाहेबांच्या आयुष्यावर पुढे खूप प्रभाव पडला, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. श्रमप्रतिष्ठा हा या तिघांनाही जोडणारा एक समान धागा होता. प्रत्येकाने शरीरश्रम करायलाच हवेत हा गांधीजींचा आग्रह होता. मणिभाई देसाई यांच्यासारख्या तरुण इंजिनियरला त्यांनी संडास साफ करायची व मैला वाहून न्यायची दीक्षा दिली होती, तर बाबा फाटक यांच्यासारख्या संस्कृत पंडिताला त्यांनी मेलेल्या ढोराचे कातडे काढण्याचे काम दिले होते. विनोबाजींसारख्या असामान्य बुद्धिमत्तेच्या तरुणाची त्यांच्याबरोबर त्यांची पहिली भेट झाली तीही भाजी निवडण्याच्या कामानिमित्ताने. कर्मवीरांच्या शिक्षणविचारातही शारीरिक श्रमाला पायाभूत स्थान होते. शेतीकाम, खडी फोडणे, इमारत बांधकामात मदत करणे, झाडलोट करणे, मुताच्या साफ करणे यांसारखे कुठले ना कुठले काम प्रत्येक विद्यार्थ्याला करावेच लागे. अशा गांधीजींचे व कर्मवीरांचे पुढे रावसाहेबांना आकर्षण वाटले यामागे कुठेतरी लहानपणच्या त्या श्रमसंस्काराचाही थोडाफार वाटा असावा. भावी जीवनावर ठसा उमटवणारा लहानपणचा आणखी एक प्रसंग इथे नमूद करावासा वाटतो. पंढरी ऊर्फ बाळ्या नावाच्या वर्गातल्या मुलाबरोबर एकदा रावसाहेबांचे कशावरूनतरी भांडण झाले. त्यांना मारून बाळ्या पळाला. त्याच्या मागोमाग रावसाहेबही पळू लागले. त्यांच्या मनगटात त्यावेळी एक चांदीचे जाड कडे होते व ते त्यांनी मागून बाळ्याच्या डोक्यात मारले. नेमकी त्या जागी त्याला खरूज झाल्याची जखम होती. कडे लागल्यामुळे जखमेतून बरेच रक्त वाहिले. थोड्या वेळाने दादांकडे तक्रार गेली. संतापून ते रावसाहेबांना शोधू लागले. गावात एक मारुतीचे देऊळ होते व मुले खूपदा त्याच्या आसपास खेळत असत. दादा तिथे पोचताच रावसाहेब देवळात घुसले. सैरावैरा पळू लागले. दादा ओरडत अजुनी चालतोची वाट... २८