पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिकरीत्या हॉस्पिटलविरुद्ध शिमगा करायला सुरुवात केली. हॉस्पिटलची मॅनेजमेंट, विशेषत: जर्मन सिस्टर्स, चांगल्याच हादरल्या. हॉस्पिटलवर मोर्चा आणण्याच्या धमक्याही येऊ लागल्या. डॉ. नारायण वैद्य हे ह्या हॉस्पिटलचे चांगले मित्र. सिस्टर्स त्यांना भेटल्या. त्यावेळी रावसाहेब पुण्याला होते. डॉ. वैद्य यांचा त्यांना फोन आला. ते तातडीने श्रीरामपूरला निघून आले. शहरातील काही बड़े डॉक्टर्स, म्युनिसिपालिटीचे प्रेसिडेंट, तसेच शहरातील इतर काही प्रमुख व्यक्ती यांची बैठक त्यांनी आयोजित केली. सगळी चौकशी झाली. सर्व प्रमुख जाणत्या नागरिकांनी हॉस्पिटलची बाजू उचलून धरली. म्युन्सिपालिटीतील महत्त्वपूर्ण मिटिंगमध्ये विरोधक बड्या डॉक्टरांचा रावसाहेबांनी कसलाही मुलाहिजा न ठेवता चांगलाच समाचार घेतला. ते उघडे पडले. गप्प झाले. अखेर वादळ थांबले. हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला मोठा दिलासा मिळाला. अशीच दुसरी एक घटना. १९७०च्या आसपासची. मातापूर येथील रावसाहेबांच्या एका पक्षकाराने हॉस्पिटलला हरेगाव रस्त्यावरील बरीच मोठी जमीन देणगी म्हणून दिली होती. काही वर्षांनी त्या गृहस्थाला कोणीतरी बदसल्ला दिला. हॉस्पिटलने त्या जागेत काही केले नाही, म्हणून वकिलामार्फत नोटीस देऊन त्याने ती जागा परत मागितली होती. हॉस्पिटलचे अॅडमिनिस्ट्रेटर रावसाहेबांकडे ती नोटीस घेऊन आले. रावसाहेबांनी त्या गृहस्थाला भेटून समजावून सांगितले. त्याने ती नोटीस लगेच मागे घेतली. योगायोग असा, की पुढे ती जमीन सरकारने अॅक्वायर केली. श्रीरामपूरला रेल्वेच्या उड्डाणपुलाचे काम चालले होते. ह्या जमिनीतून त्यासाठी माती - मुरूम घेण्याची योजना होती. जमिनीची किंमत सरकारने फारच मामुली ठरवली होती. क्षेत्र बरेच मोठे होते. हॉस्पिटलच्या वतीने रावसाहेबांनी अहमदनगर येथील कोर्टात रेफरन्स दाखल केला. प्रकरण कोर्टात चालून कोर्टाने जमिनीची किंमत सुमारे सात लाख रुपये ठरवली. शिवाय सरकारने त्या केसचा सगळा खर्च हॉस्पिटलला द्यावा असाही हुकूम झाला. त्या खर्चात वकिलीच्या फीच्या मोठ्या रकमेचाही समावेश होता. सर्व रक्कम व्याजासहित व खर्चासह वसूल होऊन हॉस्पिटलला मिळाली. चीफ अॅडमिनिस्ट्रेटर सिस्टरनी रावसाहेबांकडे त्यांच्या फीबाबत विचारणा केली. रावसाहेब मुळीच फी घेऊ इच्छित नव्हते. सिस्टरना अवघडल्यासारखे झाले. नगरला जाण्या-येण्याच्या खर्चाचे पैसे तरी घ्यावेत म्हणून त्यांनी रावसाहेबांना खूप आग्रह केला. त्यालाही रावसाहेबांनी नकार दिला. "तुम्ही हजारो गोरगरिबांची सेवा करता, त्यांना औषधोपचार करता, इतक्या दूर देशातून सर्व इथे आलात. अशा स्थितीत मी कशी काय फी घेणार ? तुमच्या माझ्याचसाठी फुललो नसे मी २८५ ...