पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही; आणि दरवर्षी जी काही तूट येईल ती मिळणाऱ्या दानातून (चॅरिटीतून) भरून काढायची, अशी आहे. प्रस्तुत लेखकाच्या दृष्टीनेही चॅरिटेबल संस्थांनी मुख्यत: चॅरिटीवर अवलंबून राहण्यात काहीच गैर नाही; किंबहुना त्यातूनच करुणा आणि दान या दोन संकल्पना समाजात रुजतील. स्वयंपूर्ण होण्याचा मोह किंवा आग्रह खूपदा मूळ उद्दिष्टांनाच अडथळा ठरू शकतो. रुग्णालयाचा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गेली पन्नास वर्षे चालवण्यात येत असलेले नर्सिंग कॉलेज. या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी दरसाल तीस विद्यार्थ्यांची निवड होते. (ही संख्या वाढवता येईल, पण ती वाढवण्यावर सरकारी नियमांचा प्रतिबंध आहे.) या कॉलेजचा दर्जा इतका उच्च आहे, की इथून बाहेर पडणाऱ्या नर्सेसना केवळ मुंबई-पुण्यातील बड्या रुग्णालयांकडूनच नव्हे तर परदेशांतूनही खूप मागणी असते. या आगळ्यावेगळ्या रुग्णालयाशी रावसाहेबांचा संबंध सुरुवातीला एक वकील म्हणून आला. काही ना काही बारीकसारीक कायदेशीर अडचणी कुठलीही आस्थापना चालवताना येतच असतात; कधी कामगारांचा प्रश्न असतो, कधी शासकीय नियमांचा प्रश्न असतो, कधी इस्टेटीचे व्यवहार असतात. अशावेळी ही मिशनरी मंडळी रावसाहेबांशी संपर्क साधत. त्यातून हळूहळू रावसाहेबांना त्यांच्या एकूण कामाची माहिती होत गेली व त्यातून ते खूपच प्रभावित झाले. हॉस्पिटलसाठी मदत म्हणून जर्मनीतून बरीच औषधे व उपकरणे येत. धर्मादाय कामासाठीच असली तरी अशी मदत स्वीकारण्यापूर्वी कस्टम्सचे बरेच किचकट सोपस्कार पार पाडावे लागत. आज इथे कोणी जर्मन नागरिक काम करत नाहीत, पण पूर्वी जेव्हा तिथले डॉक्टर्स व नर्सेस येत, तेव्हा त्यांच्या व्हिसाचीही बरीच कामे असत. अठरा वर्षे दिल्लीत असताना अण्णासाहे अशा काम त्यांना शक्य ती सर्व मदत करत. १९६८ साली रावसाहेबांचे वडील महिनाभर याच रुग्णालयात होते व इथेच ते वारले. १९८० साली त्यांच्या आईंची अखेर इथेच झाली. १९९३ जानेवारीत अण्णासाहेबांनी आपले शेवटचे आजारपण इथेच काढले. हे नाते पुढच्या पिढीतही उतरले. रावसाहेबांच्या कन्या सुजाता यांनी पदवीधर झाल्यानंतर हॉस्पिटलच्या लॅबोरेटरीमध्ये दोन वर्षे विनावेतन काम केले. चिरंजीव राजीव डॉक्टर झाल्यानंतर इथेच सहा महिने इंटर्नशिप करत होते. या इंटर्नशिपबद्दल सरकारी नियमानुसार मिळणारे वेतनही त्यांनी स्वीकारले नाही; हॉस्पिटलच्या हॉलमध्ये टीव्ही घेण्यासाठी ते वापरले गेले. त्यानंतरही त्यांनी व त्यांच्या डॉक्टर पत्नी प्रेरणा यांनी चार वर्षे माझ्याचसाठी फुललो नसे मी ... २८३