पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नसला, तरी त्यांच्याच हाती सूत्रे राहावीत ही सभासदांचीच इच्छा होती हे यावरून सिद्ध झाले. कर्तव्यनिष्ठेचा व सदाचाराचाच हा विजय होता. स्वतःची राजीनामा द्यायची इच्छा असतानाही रावसाहेबांनाच श्रीरामपूर बार कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून अन्य वकिलांनी कायम ठेवले होते याचा उल्लेख मागे आलाच आहे; त्याचीच पुनरावृत्ती दूध सोसायटीच्या बाबतीतही झाली असे म्हणता येईल. श्रीरामपूर दूध सोसायटीच्या संदर्भात प्रस्तुत लेखकाला अधोरेखित करावयास वाटतो असा पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या कामातून अनेक भूमिहीन शेतकऱ्यांनाही स्वत:च्या मालकीच्या एक-दोन गाई पाळणे व त्यातून स्वत:चा विकास करून घेणे शक्य झाले. अशी कैक उदाहरणे श्रीरामपूर परिसरात देता येतील. भूमिहीन शेतकरी म्हणजे ग्रामीण समाजातील सर्वांत वंचित घटक मानता येईल. दुग्धोत्पादनामुळे त्यांच्या घरात प्रथमच थोड्यातरी समृद्धीचा दिवा पेटला; आंदोलनाच्या आणि संघर्षाच्या मार्गाने अनेक वर्षे प्रयत्न करूनही जे जमले नव्हते, ते या दुग्धोत्पादनातून शक्य झाले. रावसाहेबांसारख्या एकेकाळच्या साम्यवाद्याच्या दृष्टीने हा अनुभव खूप प्रत्ययकारी होता. या संदर्भात लक्षणीय ठरलेली एक घटना म्हणजे डेन्मार्कमधील दुग्धव्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने श्रीरामपूरला दिलेली भेट. स्वतः मणिभाई देसाईंनी आवर्जून या शिष्टमंडळाला श्रीरामपूरला आणले होते. अनेक भूमिहीन शेतमजूर हा दुग्धोत्पादनाचा व्यवसाय कसा करत आहेत व त्या जोरावर त्यांचा प्रपंच कसा उत्तम चालत आहे हे रावसाहेबांनी त्यांना दाखवले व ते बघून त्या शिष्टमंडळाने विशेष समाधान व्यक्त केले होते. परिणामतः पाच लाख रुपयांची साधनसामग्री असलेले 'पशू रोगनिदान व उपचार केंद्र' डेन्मार्कतर्फे देणगी म्हणून मिळणार होते ते इतर अनेक ठिकाणांहून मागणी असतानाही याच सोसायटीला द्यायचे मणिभाईंनी ठरवले. या संदर्भात दोन गोष्टींकडे लक्ष वेधणे आवश्यक वाटते. एक म्हणजे, पशुपालन क्षेत्रात डेन्मार्क हा जगातला सर्वाधिक विकसित देश मानला जातो व त्यामुळे त्यांच्याकडून सोसायटीला मिळालेली साधनसामग्रीही अद्ययावत दर्ज्याची होती. दुसरे म्हणजे, सामाजिक विषमता कमीत कमी असावी यावर नॉर्वे आणि स्वीडन या दोन अन्य स्कँडेनेव्हिअन देशांप्रमाणेच डेन्मार्कचाही खूप भर होता व म्हणूनच समाजातल्या वंचित अशा भूमिहीन शेतकऱ्यांचाही या दुग्धप्रकल्पात आर्थिक विकास होत आहे ही बाब या डेन दूधतज्ज्ञांना इतकी महत्त्वाची वाटली. सहकारी चळवळीवर टीका करणे वेगळे आणि स्वतः एखादी सहकारी संस्था उभारणे व यशस्वीरीत्या चालवून दाखवणे वेगळे. श्रीरामपूर सहकारी दुग्धव्यावसायिक सोसायटीच्या निमित्ताने हे एक आव्हान रावसाहेबांनी स्वीकारले आणि बारा वर्षे अजुनी चालतोची वाट... २८०