पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोघांनीही एकत्र बैठका मारायला सुरुवात केली. नऊशेच्या पुढे बैठकांचा आकडा गेल्यावर बाबूतात्या थकला; थांबला. रावसाहेबांचा उत्साह मात्र ओसंडून वाहत होता. ते बैठका मारतच राहिले. खरे तर बाबूतात्यांचे वय तेव्हा वीस-बावीस होते, तर रावसाहेब जेमतेम नऊ वर्षांचे. पण त्यांचा चिवटपणा आणि काटकपणा थक्क करणारा होता. शेवटी हजार बैठका पुऱ्या केल्यानंतरच रावसाहेब थांबले. बाबूतात्या आणि इतर बघणारी मुले यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. "अरे, तू पोर आहेस का हैवान ?" असे म्हणत सगळे आ वासून रावसाहेबांकडे पाहत राहिले. शेतीकाम आणि मैदानी खेळ या दोन्ही गोष्टींमुळे रावसाहेबांचे शरीर कणखर झाले. या काटक शरीरयष्टीचा भावी आयुष्यात रावसाहेबांना खूप फायदा झाला. त्यांच्या दीर्घायुष्याचे हे एक महत्त्वाचे कारण असावे. या अलीकडच्या पंधरा-वीस वर्षांत रावसाहेबांचे जीवन अधिकच झळाळून गेले, विदेशप्रवासापासून ग्रंथलेखनापर्यंत त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी याच कालखंडात घडल्या; अनेक मान-सन्मान याच काळात त्यांच्या वाट्याला आले. दीर्घायुष्य हा नियतीने दिलेला मोठाच प्रसाद ठरला. आज शाऐंशीव्या वर्षीही रावसाहेब तरुणांना लाजवणाऱ्या वेगाने चालतात, लांबलांबचे प्रवास करतात, जराही न दमता तासन्तास सभा-बैठका व इतर कामे पार पाडतात याचा धागा कुठेतरी बालपणी कमावलेल्या सुदृढ शरीराशी जुळतो. आपल्या तब्येतीची उत्तम काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे असे रावसाहेब मानतात; किंबहुना स्वतःच्या तब्येतीची हेळसांड केल्यामुळे आजारी पडणे हा गुन्हा आहे असेही ते खूपदा म्हणतात. डॉक्टरांनी सांगितलेले पथ्यपाणी ते क्षाने पाळतात; त्यात चालढकल जराही नाही. तसा त्यांचा आहार चांगला आहे आणि चवीचवीने जेवायला त्यांना आवडतेही; पण जे त्यांना चालत नाही त्याला बोटही लावणार नाहीत. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ वर्ज्य आहे म्हटल्यावर तशा कुठल्याही पदार्थाला, कोणी कितीही आग्रह केला, तरी स्पर्शही करणार नाहीत. जिथे जेवणार असतील, तिथल्या गृहिणीला तशी पूर्वसूचना दिलेली असेल. लांबच्या प्रवासावरून आले असले, खूप शिणलेले असले तरी अर्धा-पाऊण तास फिरणे कधी चुकवणार नाहीत; तसेच सकाळचा व्यायामही. इतरांच्या प्रकृतीचीही त्यांना काळजी असते. कोणाला पोटाचा त्रास असेल तर त्याला काही आसने सांगतील, कोणाच्या नाकाचे हाड वाढले असेल तर त्यालाही काही इलाज सुचवतील. आरोग्यरक्षण हा त्यांच्या दृष्टीने जणू नैतिकतेचाच एक पाडळीतल्या पाऊलखुणा... २७