पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुधाकडे उत्पन्नाचे एक साधन म्हणून बघितलेही जात नसे. या संदर्भात अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत रावसाहेबांनी शेतकऱ्यांना गोपालनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. त्यासाठी सतत दौरे काढले, गाठीभेटी घेतल्या, सल्लामसलती केल्या. एकप्रकारे हे लोकशिक्षणाचेच काम होते. चळवळीच्या पार्श्वभूमीमुळे लोकसंपर्काची कला रावसाहेबांच्या अंगवळणीच पडली होती व तिचा खूप विधायक असा उपयोग या प्रसंगी झाला. लोकशिक्षणानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे दुग्धोत्पादनासाठी रावसाहेबांनी केलेली संस्थात्मक उभारणी. प्रथम त्यांनी श्रीरामपुरात शासकीय दूधसंकलन केंद्र सुरू होईल अशी व्यवस्था केली. अशा विविध चांगल्या शासकीय योजना अस्तित्वात असतातच, पण त्यांचा लाभ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर कोणीतरी पुढाकर घेणे अत्यावश्यक असते; अन्यथा या योजना केवळ कागदावर राहतात. योजकस्तत्र दुर्लभ: असा काहीसा हा प्रकार असतो. असे दूधसंकलन केंद्र चालवणे व्यावहारिक पातळीवर शक्य व्हावे यासाठी रोज किमान तीनशे लिटर दूध जमा होणे आवश्यक असते; त्याशिवाय केंद्र व्यवस्थापनाचा खर्च भरून निघत नाही. श्रीरामपुरात या केंद्रावर पहिल्या दिवशी फक्त पंच्याहत्तर लिटर दूध जमा झाले होते. पण रावसाहेब निराश झाले नाहीत. त्यांनी सातत्याने प्रयत्न जारी ठेवले. येणा-या दुधाचे प्रमाण हळूहळू वाढत गेले; रोजचे सहा- सातशे लिटरपर्यंत गेले. संस्थात्मक उभारणीची पुढची पायरी म्हणजे १९७६ साली झालेली 'श्रीरामपूर सहकारी दुग्ध उत्पादक सोसायटी.' रावसाहेबच तिचे प्रवर्तक व चेअरमन होते. सोसायटीमध्ये रावसाहेबांनी विकसित केलेली आधुनिक विज्ञाननिष्ठ व सेवाप्रधान कार्यसंस्कृती हा तिसरा महत्त्वाचा मुद्दा. गोपालन हे शेतकऱ्याच्या तसे रक्तातच होते, पण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करायचे हे सोसायटीने दाखवून दिले. पशुखाद्याची सोय केली, संकरित गाईंचा प्रसार केला, रोगप्रतिबंधकारक लस टोचून गाईंचे आरोग्य सुधारले, गरजू शेतकऱ्यांना व्यवसायवृद्धीसाठी कर्जपुरवठा केला. मणिभाई देसाईंच्या पुढाकारातून १९७२ साली अशोक सहकारी साखर कारखान्यात 'कृत्रिम रेतन केंद्र सुरू करण्यात आले होते. उत्तम गाईंच्या पैदाशीसाठी ते आवश्यकच होते; पण दुर्दैवाने काही अंतर्गत कारणांनी ते बंद पडले होते. सोसायटीने पुढाकार घेऊन ते पुन्हा सुरू केले आणि स्वतःच्या अखत्यारीत यशस्वीरीत्या चालवले. साखर कारखान्यांव्यतिरिक्त अन्य कोणीही अशाप्रकारे कृत्रिम रेतन केंद्र तोवर चालवले नव्हते. संकरित गाईंची देखभाल कशी करावी, दुग्धोत्पादन कसे वाढवावे, दैनंदिन खुराक कसा द्यावा, वेगवेगळ्या शासकीय अजुनी चालतोची वाट... २७८