पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गावी शेती आहे. एकदा त्यांच्याकडे गेलो असताना बघितलेला एक प्रसंग माझ्या आठवणींमध्ये कायमचा कोरला गेला आहे. आम्ही सकाळचे फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो. त्यांच्या शेताला लागूनच दुसरे एक शेत आहे आणि ह्या दोन्ही शेतांच्या हद्दीवर एक गाय आडवी पडलेली दिसली. खूप आजारी दिसत होती आणि कशामुळे तरी तिला होत असलेल्या असह्य वेदना तिच्या डोळ्यांमधून जाणवत होत्या. शेजारीच तिचा मालक शेतकरी व दुसरा एक खेडूत बसलेले होते व आपल्या समजुतीनुसार त्या गाईवर काहीतरी इलाज करत होते. ती खूप अत्यवस्थ आहे हे त्यांना अर्थातच कळत होते, पण मुक्या प्राण्याला नेमके काय होत आहे हे कळणार तरी कसे आणि ते कळल्याशिवाय अचूक इलाज करणार तरी कसा ? मग सलाइन लावून अंदाजपंचे काहीतरी औषध टोचणे एवढेच त्या शेतकऱ्याच्या हाती उरते. तज्ज्ञ पशुवैद्यक असलाच तर लांब तालुक्याच्या गावी असणार. त्याच्याशी संपर्क साधणेही अवघडच. दवाखान्यात गाईला न्यायचे म्हटले तर त्यासाठी ट्रॅक्टर-टेंपोची व्यवस्था करणे, गाईला उचलणे हे सगळेही मुश्किल. माणसांना होऊ शकतात ते सगळे रोग-विकार गाईंनाही होऊ शकतात आणि वेळप्रसंगी होतातही. अर्थात हे गाईंप्रमाणे सर्वच गुरांच्या बाबतीत खरे आहे. अशावेळी सर्वसामान्य शेतकरी किती अगतिक असतो हे त्या दिवशी प्रस्तुत लेखकाला प्रकर्षाने जाणवले. दुसऱ्या दिवशी त्या गाईच्या वेदना सरल्या; ती दगावली. पण तिचे ते करुण डोळे अजून आठवतात. म्हणूनच या संदर्भात श्रीरामपूरच्या व इतरही दूधसंघांनी केलेले काम महत्त्वाचे वाटते. बाइफच्या सहकार्याने रावसाहेबांनी गुरांना थेट त्यांच्या गोठ्यात जाऊन औषधे द्यायची आणि त्यांना रोगप्रतिबंधकारक लस टोचायची कार्यक्षम यंत्रणा उभारली. त्यामुळे दूधउत्पादन वाढून शेतकऱ्यांचा फायदा झालाच, पण गायींचेही एकूण जीवनमान खूप सुधारले. वकिली करताकरताच सत्तरच्या व ऐंशीच्या दशकांमध्ये श्रीरामपूर परिसरातील दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी अण्णासाहेबांपासून प्रेरणा घेऊन रावसाहेबांनी खूप प्रयत्न केले. त्यांचे नेमके महत्त्व आजच्या वाचकाच्या, विशेषतः शहरी वाचकाच्या, लक्षात यावे, यासाठी काही मुद्दे अधोरेखित करणे इथे आवश्यक वाटते. पहिला मुद्दा म्हणजे घरी एखाद दुसरी गाय पाळण्याची पद्धत बहुसंख्य शेतकऱ्यांमधे पूर्वापार प्रचलित होती व त्यासाठी आवश्यक तेवढे पशुपालनाचे जुजबी प्रशिक्षण त्याला वंशपरंपरेनेच मिळत होते तरी गाईंनी दूध द्यायचे प्रमाणच इतके अल्प होते, की मिळणारे दूध घरच्या वापरातच संपून जायचे; शिवाय माझ्याचसाठी फुललो नसे मी -