पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विद्यार्थ्यांनी आपापल्या घरच्या शेतीमध्ये सुधारणा घडवून आणल्या. शेतीला सुरुवात केली त्याच सुमारास रावसाहेब दुग्धव्यवसायाकडेही वळले. दोन्हींची परस्परपूरकता त्यांना पूर्वीच पटली होती. वडील बंधूंचे उदाहरण डोळ्यांपुढे होतेच. यात मणिभाई देसाई यांचाही मोठा वाटा होता. मणिभाई हे महात्मा गांधींचे एक निष्ठावान चेले. गांधीजींचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे राजकारणाइतकेच समाजव्यवहाराच्या वेगवेगळ्या अंगांनाही ते महत्त्व देत व आपल्या अनुयायांना वेगवेगळ्या जीवनक्षेत्रांत कार्य करायला प्रेरित करत. त्यांच्याच प्रेरणेने मणिभाईंनी गोपालन हे आपले क्षेत्र निश्चित केले होते आणि आजन्म अविवाहित राहून त्यांनी या क्षेत्रात खूप मोलाचे असे योगदान दिले. पुण्याजवळ उरळीकांचन येथे त्यांनी बाइफ ( Bharat Agro Industrial Foundation) ही संस्था सुरू केली व लौकरच ती आंतरराष्ट्रीय पातळीवरही नामांकित बनली. १९५९ च्या सुमारास अण्णासाहेब व रावसाहेब उरळी कांचन ला गेले होते. रावसाहेबांची व मणिभाईंची छान मैत्री जुळली; पुण्याच्या वैशाली हॉटेलात इडली डोसा खाताखाता त्यांच्या खूप गप्पा रंगत. मणिभाईंचे काम प्रत्यक्ष पाहिल्यावर दोघेही शिंदे बंधू खूप प्रभावित झाले होते. मणिभाईंनी उरळीकांचनला गीर गाईंचा मोठा कळप पाळला होता. गुजरातमधल्या या गाई देशात सर्वोत्तम गणल्या जात. पण आपल्या देशोदेशी केलेल्या प्रवासात अधिक दूध देणाऱ्या गाईंची पैदास करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. त्याचा वापर करून त्यांनी उरळीकांचन येथे होलस्टिन व जर्सी या संकरित गाईंची पैदास सुरू केली. अण्णासाहेबांनीही स्वतःच्या शेतीला जोडून दुग्धशाळा चालवली होती. त्यांनी स्वतः असल्या शंभर संकरित गाईंचा कळप पाळला होता. एक आदर्श डेअरी म्हणून त्यांची डेअरी प्रसिद्ध झाली. रावसाहेबांनीही आपल्या शेतीला दुग्धव्यवसायाची जोड दिली. १९५९ साली त्यांनी गीर जातीची बहुळण नावाची एक गाय पहिल्यांदा विकत घेतली. तिला पाच सड होते आणि पाचही सडांतून ती दूध देत असे. सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तिन्ही वेळा तिची धार काढावी लागे. रोजचे बारा-चौदा लिटर दूध ती देई. गाईंच्या स्पर्धेतही तिला एकदा बक्षीस मिळाले होते. ही खूप गुणी व शहाणी अशी गाय होती. गाईंचा कळप एका शेतावरून दुसऱ्या शेतावर चरण्यासाठी नेताना ही बहुळण गाय सर्वांच्या पुढे असायची आणि बाकी सगळ्या गाई तिच्या मागोमाग चालायच्या. पुढे बहुळण गाईला कालवड (वासरू) झाली. तिचे नाव मोहिनी ठेवले. ती होलस्टिन जातीची होती व रोज वीस पंचवीस लिटर दूध द्यायची. अजुनी चालतोची वाट... २७४