पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणतात तशी, म्हणजेच शेतीसाठी तापदायक अशी असायची. अशा जमिनीवर रावसाहेबांना खूप कष्ट घ्यावे लागले. तिचे 'लेव्हलिंग' करून, मोठाले चर खोदून मगच ती लागवडीखाली आणता आली. मुंबईतल्या आरे कॉलनी येथील शासकीय गौळीवाड्यात त्यावेळी शेणखत मिळायचे; वाहुतकीचा खर्च व त्रास सहन करून रावसाहेबांनी ते शेणखत आणवले. विहिरी खोदल्या. इंजिन्स बसवली. शेतात पाइपलाइन्स टाकल्या. पाण्याचा निचरा व्हावा म्हणून चर खणले. लांबून लांबून नवे उत्तमोत्तम बियाणे आणले. स्वतःच्याच शेतात ऊस, गहू, चवळी यांच्या बियाण्यांचे उत्तम प्लॉट्स तयार केले. कंटूर पद्धतीने उसाची लागवड केली. श्रीरामपूरहून राहुरी कृषी विद्यापीठ खूप जवळ आहे. वरचेवर तिथे जाऊन नवीन कृषिसंशोधन काय काय चालले आहे याची ते माहिती घेत. फलटणजवळच्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राच्याही ते नित्य संपर्कात राहत. जिथे जिथे चांगली शेती केली जाते असे कानावर येई तिथे तिथे जाऊन नवीन काही शिकायची त्यांची तयारी असे; कितीही कामे असली तरी त्यासाठी ते वेळ काढत. अगदी लांबवरच्या पंजाबमधली हरितक्रांतीही त्यांनी तिथे जाऊन अभ्यासली होती. दिल्ली येथे १९६० साली भरलेल्या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनालाही ते श्रीरामपूर परिसरातील पाच-पन्नास शेतकरी बरोबर घेऊन गेले होते. बंधू अण्णासाहेब केंद्रात कृषिराज्यमंत्री होण्यापूर्वीची ही घटना आहे हेही नमूद करण्याजोगे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गांडूळ खत यांसारख्या गोष्टी आज खूप प्रचलित आहेत; पण श्रीरामपूर परिसरात त्यांचा सर्वप्रथम वापर अण्णासाहेबांनी व नंतर त्यांच्या जोडीने रावसाहेबांनीच केला. या सर्व परिश्रमांना चांगले फळही मिळाले. एकरी ९० टन असे उसाचे विक्रमी उत्पादन त्यांनी घेतले. गव्हाचेदेखील एकरी २२ पोती ( सुमारे २५ क्विंटल) असे विक्रमी उत्पादन घेतले. कोबी, भेंडी, भुईमूग, कपाशी अशी वेगवेगळी उत्तम पिके त्यांनी काढली. त्यांची गोव्यातली शेतजमीन उसाला फारशी पूरक नव्हती. तेव्हा तिथे त्यांनी नारळ, सुपारी, काजू, मिरी, रबर, कॉफी, अननस अशी स्थानिक हवामानाला साजेशी पिके घेतली. स्वतःच्या शेतावर ५०० सागवान, १५०० चिंच, ५०० निलगिरी अशी झाडे लावली. सीताफळे, पेरू, आवळा यांचीही झाडे लावली. वृक्षशेती, औषधी वनस्पती, वृक्षांच्या साह्याने पर्यावरणसंवर्धन वगैरे अनेक प्रयोग केले. स्वतःच्या उदाहरणाने लोकांपुढे आदर्श ठेवला. ग्रामीण नवयुवकांना आधुनिक शेतीचा परिचय व्हावा यासाठीही धडपड केली. ह्यासाठी श्रीरामपूर येथील रयतच्या शैक्षणिक संकुलातील तिन्ही महाविद्यालयांमध्ये त्यांनी शेतीविषयक दिशादर्शक प्रकल्प सुरू केले. तिथून प्रेरणा घेऊन मग असंख्य माझ्याचसाठी फुललो नसे मी २७३