पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सांभाळण्यासाठी ते वेळात वेळ काढून जात असत आणि त्यामुळेच जेव्हा शक्य झाले तेव्हा त्यांनी स्वतःही शेती करायला सुरुवात केली. श्रीरामपूरपासून सात मैलांवर असलेल्या भोकर येथे अण्णासाहेबांनीच त्यांना प्रयत्नपूर्वक खंडाने वहिवाटीसाठी जमीन घेऊन दिली होती. कोर्टाचे काम संपले की रावसाहेब भोकरची वाट धरत. तिथे जायला सायकलशिवाय दुसरे वाहन नसायचे. ती सायकलही भाड्याचीच असायची. पुढे त्यांनी साठ रुपये खर्चून एक सेकंड हँड सायकल विकत घेतली. रस्ता कच्चा होता. वाटेत दोन ओढे लागत. ते ओलांडताना सायकल खांद्यावर घेऊन आणि चिखल तुडवत जावे लागे. कोर्टात सुटाबुटात वावरणाच्या रावसाहेबांनी यातही कधी कमीपणा मानला नाही. हळूहळू शिकतशिकत रावसाहेब शेती वाढवत गेले. सुरुवातीला खंडाने घेतलेली शेती चौदा एकर होती. ती वाढत वाढत चाळीस-पन्नास एकरांपर्यंत गेली. या संदर्भातली एक घटना नमूद करण्यासारखी आहे. यापूर्वीच कूळकायदा आला होता. रावसाहेबांच्या ताब्यातील शेतीची मुदत संपायला बराच अवकाश होता. मनात आणले असते तर रावसाहेब खंडाने घेतलेली शेती सहज हडप करू शकले असते. त्यांच्याजवळची सगळी कागदपत्रे अगदी चोख होती. कायदाही त्यांच्याच बाजूचा होता. शिवाय ते स्वतःच उत्तम वकील असल्याने निकाल आपल्या बाजूनेच लागेल अशाप्रकारे ते केस लढवूही शकले असते. याउलट जमिनीची मालकी ज्यांची होती ते शेतकरी अगदी सामान्य स्थितीतले होते. पण तरीही त्यांच्या गरिबीचा किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन आपण त्या जमिनी गिळंकृत कराव्यात असा विचारही रावसाहेबांच्या मनाला शिवला नाही. आपणहूनच त्यांनी त्या जमिनी मूळ मालकांना खंडाची मुदत संपण्यापूर्वीच परत केल्या. एवढेच तर एका जमिनीत स्वतःच्या नावावर असलेला शेतीसाठी वापरायच्या पाण्याचा ब्लॉकदेखील त्यांनी जमिनीच्या मूळ मालकांच्या नावे करून दिला. खरे तर मध्यंतरी झालेल्या कायद्यातील बदलामुळे शेतीची मालकी बदलली तरीही पाण्याचा ब्लॉक ज्याच्या नावावर घेतलेला असायचा त्याच्याच नावाने कायम राहणार होता; त्यामुळे जमीनमालकाच्या नावाने तो हस्तांतरित करायचे नाकारून रावसाहेब त्याची अडवणूक करू शकले असते. त्या भोकरच्या जमिनी सोडल्यावर रावसाहेबांनी जवळच बेलापूर येथे व लांब गोव्यातही जमिनी खरेदी केल्या. नवीन जमीन विकत घेताना ती चांगली असण्याची शक्यता कमीच असायची, कारण चांगल्या जमिनी विकायला कोण सुखासुखी तयार होणार ! त्यामुळे उपलब्ध असणारी जमीन बहुतेकदा उपळट व खारवट अजुनी चालतोची वाट... २७२