पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिला चरण्यासाठी नेत. रावसाहेब म्हणतात, "कोवळं लुसलुशीत गवत तिला खूप आवडायचं. ती ते जीव लावून खाताना बघून मलाही समाधान वाटायचं, मन भरून यायचं. बऱ्याच वेळा म्हैस चरताना मी तिच्या पाठीवर बसून राहायचो. अशावेळी पाठ असलेली गाणी किंवा कविता मोठ्याने म्हणण्यात मी रमून जात असे." या शब्दांमधून पाझरणारा वात्सल्यभाव आणि मायाळूपणा रावसाहेबांमध्ये आजही खूप असल्याचे जाणवते. दूध काढण्यापासून ते अंघोळ घालण्यापर्यंत गाई-म्हशींची अनेक कामे इतरांप्रमाणे रावसाहेबांनाही लहानपणापासून करावी लागत. गाई वळण्यासाठी कधीकधी दिवसे दिवस डोंगरावरही राहावे लागे. तिथे निसर्गाशिवाय कसलीच सोबत नसे. त्याकाळची लोकवस्ती आजच्या एक चतुर्थांशदेखील नव्हती व त्यामुळे एकूण गजबजाट खूप कमी होता, परिसरात मोकळेपणा अधिक होता हे लक्षात घ्यायला हवे. सारंगी नावाची त्यांची एक घोडी होती. आजोबांबरोबर रावसाहेब तिच्यावर बसायला लागले; हळूहळू घोडेस्वारीत तरबेज झाले. नाठाळ घोड्यालाही घट्ट मांड ठोकून व वेगात दौडवून ते वठणीवर आणू शकत. त्याकाळी ग्रामीण भागात घोडा हे प्रवासाचे एक मोठेच साधन होते. ही सर्व कामे मोकळ्यावर, निसर्गाच्या सहवासातच होत असत व त्यामुळे निसर्गप्रेम आपोआपच अंगी रुजत गेले. ऋतुमानाप्रमाणे बदलणारी निसर्गाची विविध रूपे, रंग आणि गंध टिपणारी एक संवेदनशीलता अंगात भिनत गेली. पुढे कम्युनिस्ट चळवळीत भूमिगत असतानाच्या तीन वर्षांत हे निसर्गप्रेम जगणे सुसह्य करून गेले; शेताशिवारांतून, डोंगरदऱ्यांतून लपतछपत संचार करताना सोबत करत राहिले. कामाच्या निमित्ताने होणाऱ्या शरीरश्रमाला लहानपणच्या खेळांचीही जोड होती. कारण त्यांचे जवळजवळ सर्वच खेळ मैदानी होते; बैठे खेळ हा प्रकारच त्या काळी फारसा नव्हता. हुतूतू, खो-खो, आट्यापाट्या, सूरपारंब्या, शिवाशिवी, पोहणे, झाडावर चढणे, कुस्त्या असले त्यांचे खेळ असत व हे सर्वच खेळ करमणुकीबरोबरच भरपूर घामही गाळायला लावणारे होते. याचा एक फायदा म्हणजे त्यांची तब्येत सणसणीत बनली, अंगी भरपूर काटकपणा भिनला. या काटकपणाचे द्योतक म्हणून एक गमतीदार प्रसंग सांगता येईल. गावच्या तालमीत बाबूतात्या नावाचा एक कसलेला पैलवान होता. "माझ्यासारख्या बैठका काढून दाखवशील का?" असे म्हणत त्याने एकदा रावसाहेबांना डिवचले. मागचा पुढचा कसलाही विचार न करता रावसाहेबांनी त्याचे आव्हान स्वीकारले. अजुनी चालतोची वाट... २६