पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यानंतर बैठक संपवावीच लागली. शेवटी रावसाहेबांनी हे सर्व प्रकरण यशवंतराव चव्हाण यांच्या कानी घालायचे ठरवले. यशवंतराव त्यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेसचे जवळजवळ सर्वेसर्वाच होते. ही साधारण १९७०च्या आसपासची गोष्ट. यशवंतराव चव्हाण पारनेर येथे सेनापती बापट यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी येत होते. सहकारी चळवळीतले महाराष्ट्रातले एक महत्त्वाचे नेते खासदार किसन वीर यांनी रावसाहेबांना त्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येण्यास सुचविले. त्यानुसार ते सुप्याला शिष्टमंडळ घेऊन गेले. सुप्याच्या विश्रामगृहावर ते भेट झाली. यशवंतरावांच्या बरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक, प्रदेश काँग्रेसचे आणि राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतदादा पाटील, मंत्री बाळासाहेब देसाई, खताळ पाटील, आबासाहेब निंबाळकर, तसेच केंद्रीय मंत्री अण्णासाहेब शिंदे, इतर खासदार, आमदार व किसन वीर असा खूप मोठा लवाजमा होता. बराच तपशील मांडून रावसाहेब यशवंतरावांना म्हणाले, "लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवून तुमचे म्हणणे सभासदांना पटवून द्या, कारखान्याचे नियंत्रण मिळवा, असे आम्हांला कदाचित सांगण्यात येईल. पण सभासदांच्यावर आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांचा एवढा दबाव आहे, की आम्ही तर सोडाच पण खुद्द इंदिरा गांधी आणि तुम्हीसुद्धा यांच्या विरोधात उभे राहिल्यास ते तुमचाही पराभव करतील. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे, अशा गृहीततत्त्वावर तुम्ही त्यांना संधी देता. एवढा गैरकारभार पुढे आला तरी या राज्यातले काही मंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहतात ही अतिशय लांच्छनास्पद बाब आहे. यांची शक्ती म्हणजे भस्मासुराची शक्ती आहे. तुम्ही असे भस्मासुर पोसत आहात. ते एक दिवस तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा." अतिशय जळजळीत शब्दांमध्ये रावसाहेब त्यांचे म्हणणे मांडीत होते. त्यांचे बंधू अण्णासाहेब शिंदे यांनी मध्येच काही बोलून त्यांना शांत करायचा प्रयत्न केला. तथापि रावसाहेबांच्या भावना एवढ्या तीव्र झालेल्या होत्या, की मागचा पुढचा विचार न करता तेवढ्याच आवेशात ते त्यांना म्हणाले, "तुम्ही कृपा करून मला मध्येच थांबवू नका." शेवटी सगळी कैफियत मांडून झाल्यावरच रावसाहेब थांबले. सर्व जण स्तब्ध होते. वातावरण खूपच गंभीर झाले होते. तेवढ्यात किसन वीर तथा आबा पुढे होऊन म्हणाले, "साहेब, यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे." पण यशवंतरावांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. यशवंतराव या प्रकरणी हस्तक्षेप करणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यावर रावसाहेबांनी व गोविंदराव आदिकांनी हे प्रकरण हायकोर्टात न्यायचे ठरवले. रामराव आदिकांच्या माझ्याचसाठी फुललो नसे मी २६९