पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब तेव्हा भाषण करत होते. त्यांच्या नजरेस हे दृश्य पडताच आपल्या भाषणातच त्यांनी त्या कार्यकर्त्यांना सर्वांसमक्ष झापले. "अशा कार्यकर्त्यांची आम्हांला गरज नाही,” असे त्यांनी त्या सभेतच जाहीरपणे सांगितले. ते कार्यकर्ते तर गांगरलेच, पण सर्व श्रोतेही चपापले. 'हा माणूस खरोखरच मूल्यांची चाड असणारा आहे, जसा बोलतो तसाच वागणारा आहे,' हे त्यांना जाणवले. लढ्याचा सर्व खर्च रावसाहेब व त्यांचे कार्यकर्ते स्वतःच्या खिशातूनच वर्गणी जमा करून भागवत होते. कारखान्याच्या कारभाराविरुद्ध रावसाहेबांनी बरीच निवेदने काढली, पत्रव्यवहार केला. मुंबई - दिल्लीच्या वाया केल्या. साखर संचालक, राज्य सहकारी बँक, सहकारमंत्री यांचे दरवाजे ठोठावले. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत ते गेले. विनायकराव पाटील हे त्यावेळी सहकारमंत्री होते. लॉ कॉलेजात शिकत असतानापासून त्यांचा व रावसाहेबांचा परिचय होता. तेव्हा नागपूरला विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. रावसाहेब व बाळासाहेब विखे पाटील नागपूरला जाऊन त्यांना भेटले. त्यावेळी विनायकराव किडनीच्या विकाराने त्रस्त होते, पण तरीही त्यांनी या प्रश्नात लक्ष घातले. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार रजिस्ट्रारना कारखान्याची चौकशी करायचा त्यांनी आदेश दिला. चौकशी अधिकाऱ्यापुढे रावसाहेबांनी आपली बाजू पूर्ण तयारीनिशी मांडली. सर्व पुरावे सादर केले. सारे वकिली कौशल्य पणाला लावले. चौकशीचा निकाल अपेक्षेप्रमाणेच लागला. प्रस्थापित संचालकमंडळ बरखास्त करण्याचा निर्णय झाला. सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडत होता. एका अर्थाने रावसाहेबांना तो आपला नैतिक विजयच वाटला. पण नंतर अचानक परिस्थिती पालटली. यशवंतराव मोहिते सहकारमंत्री बनले व त्यांनी साखरसंचालकांचा निर्णय फेटाळून लावला. ही बातमी कानावर येताच रावसाहेब गोविंदराव आदिक व अन्य काही सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुंबईला जाऊन मंत्रिमहोदयांना भेटले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रावसाहेबांनी कारखान्याच्या गैरकारभाराविषयी काही सांगायचा प्रयत्न केला. पण त्यांचा एक शब्दही ऐकून घ्यायची मंत्र्यांची तयारी नव्हती. "लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने बरखास्त करावे हा सहकारी चळवळीतील लोकशाहीला काळिमा आहे. असले काहीही मी खपवून घेणार नाही," असे त्यांनी चढ्या आवाजात रावसाहेबांना सुनावले. रावसाहेबांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला, पण मंत्रिमहोदय त्यांचे काहीच बोलणे ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते. "मी माझ्या मतावर ठाम अजुनी चालतोची वाट... २६८