पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वत:ची तुंबडी भरायचा मार्ग म्हणून पाहणे, कारखान्याची वाहने आणि गेस्ट हाऊस यांचा गैरवापर, कारखान्याच्या आधारावर स्वत:चे खासगी धंदे चालवणे, नोकरभरती व दैनंदिन प्रशासनातील मनमानी, अॅडव्हॉन्स वाटप करताना वशिलेबाजी, ऊसतोडणीच्या वेळी व उसाचे पेमेंट करताना होणारा पक्षपात, प्रत्यक्ष दिलेल्या रकमेपेक्षा बऱ्याच अधिक रकमेच्या व्हाऊचरवर सह्या घेणे असे अनेक गैरप्रकार होत होते. याविरुद्ध आवाज उठवायचे रावसाहेबांनी ठरवले. पण हे काम खूपच अवघड होते. आजही साखर कारखान्याच्या चेअरमनची आपल्या परिसरावर बऱ्यापैकी पकड असते; त्याकाळी तर ती आजच्याहून खूपच अधिक होती. बँका, सोसायट्या, पोलीस, रेव्हेन्यू, इरिगेशन यांच्याभोवती ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवन गुंफलेले असते व या सर्वांवर चेअरमनचा प्रभाव असतो. मनात आणले, तर तो तुमचा खूप फायदा करून देऊ शकतो आणि मनात आणले, तर तो तुमची पुरती मुस्कटदाबीही करू शकतो. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याचा ऊस अगदी पूर्ण तयार असेल, पण आयत्यावेळी तो स्वीकारण्यास साखर कारखान्याने टाळाटाळ केली, तर त्या शेतकऱ्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ येते. त्यामुळेच चेअरमनविरुद्ध उभे राहायला कुठलाच शेतकरी सहसा तयार नसतो. पण तरीही रावसाहेबांनी चेअरमनच्या मनमानीविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. नियमानुसार संचालकमंडळ असायचे, पण ते केवळ नावापुरते. बाकीचे संचालक अगदी सामान्य शेतकरी असत; आपल्याला संचालक बनवले हेच चेअरमनचे मोठे उपकार, अशी त्याची भावना असे. त्यामुळे चेअरमन सांगेल त्यानुसारच संचालक मंडळाचे सर्व निर्णय होत. लढ्याला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम रावसाहेबांनी कारखान्याच्या कायदा सल्लागारपदाचा राजीनामा दिला. कारखान्याचे कार्यक्षेत्र चाळीस गावांमध्ये पसरले होते. सर्व गावे रावसाहेबांनी पिंजून काढली. प्रामुख्याने गोविंदरा आदिक व इतरही काही सहकारी त्यांच्याबरोबर होते. एकेका गावात तीन-तीन, चार-चार सभा घेतल्या. प्रत्येक सभेत ते कारखान्यातील भ्रष्टाचार ग्रामस्थांसमोर मांडत. सकाळी नऊ ते रात्री अकरा ते सतत याच कामात असत. आपल्या वकिलीकडे दुर्लक्ष करूनच हे सगळे त्यांना करावे लागे. गांधीजींचे साधनशुचितेचे तत्त्व नुसते उद्दिष्ट चांगले असून चालणार नाही, तर त्या उद्दिष्टापर्यंत पोचायचे आपले मार्गही नीतिमानच हवेत हे तत्त्व • रावसाहेबांनी कटाक्षाने पाळले व आपल्या समर्थकांनाही पाळायला लावले. आपापल्या संस्थांची वाहने या प्रचारसभांसाठी वापरावयाची नाहीत, हा त्यातलाच एक भाग. त्यांचे काही कार्यकर्ते एकदा माळेवाडीतील एका सभेला तालुका खरेदी-विक्री संघाच्या जीपमधून आले. - माझ्याचसाठी फुललो नसे मी २६७