पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घ्यावे लागले; व्यावसायिक निर्णयस्वातंत्र्य असे फारसे राहिले नाही. किंवा सत्ता एकाच कुटुंबात राहण्याची आपल्याकडची प्रवृत्ती अन्य जीवनक्षेत्रांप्रमाणे सहकारातही आली; संस्थेचे प्रवर्तक असलेल्या बापाकडून त्याच्या मुलाकडे व त्या मुलाकडून त्याच्या मुलाकडे अशाप्रकारे सत्तांतर होताना दिसते; युरोपातील सहकारी चळवळीत हा प्रकार नाही. समाजासाठी विनावेतन काही सेवा द्यायची, एकत्र येऊन शक्यतो आपणच आपले प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवायची पाश्चात्त्यांची प्रेरणा आपल्या मानसिकतेत फारशी नाही; समाजाच्या समाजीकरणाची ती पातळी अद्याप आपण गाठलेली नाही हाही एक महत्त्वाचा फरक जाणवतो. पण सहकारामुळे आपल्या ग्रामीण जीवनात बराच फरक पडला हेही नक्की. महाराष्ट्रापुरता विचार केला तर सहकारी चळवळ म्हटली, की शहरी वाचकापुढे मुख्यतः साखर कारखानेच उभे राहतात; दूधसंस्था, पतसंस्था, बाजारसमित्या, कुक्कुटपालन अशा इतर सहकारी उपक्रमांची त्याला काहीच माहिती नसते. अनेक गैरसमज त्या वाचकाच्या मनात ठामपणे रुजलेले असतात. पण ज्याने ग्रामीण भाग उघड्या डोळ्यांनी बघितला आहे त्याला हे मान्य करावेच लागेल, की जिथे जिथे सहकारी चळवळ प्रामाणिकपणे राबवली गेली आहे, तिथे तिथे समृद्धीची फळे आज नक्कीच दिसतात. अर्थात एकूण समाजाला जडलेल्या भ्रष्टाचाराच्या रोगांपासून एक सहकारी चळवळ तेवढी अलिप्त राहील, अशी अपेक्षा बाळगणे भाबडेपणाचेच होईल. पन्नास आणि साठच्या दशकांत महाराष्ट्रात आणि विशेषतः नगर जिल्ह्यात सहकारी चळवळ रुजली आणि नेमका हाच कालखंड रावसाहेबांच्या वकिलीचा प्रारंभकाळ होता. साहजिकच सहकारी चळवळीची चांगली तसेच वाईट बाजूही त्यांना खूप जवळून बघता आली. श्रीरामपूर परिसरातील बहुसंख्य सहकारी संस्थांचे ते देशीर सल्लागार होते व त्यामुळे सर्वसामान्य नाग पर्यंत सहसा न पोहोचणाऱ्या अनेक गोष्टीही त्यांना कळत होत्या. साम्यवादी आंदोलनाचे बरेच चटके खाऊन झाल्यावर मगच रावसाहेब वकिलीकडे वळले होते व त्यामुळे आता कुठल्याही संघर्षात पडायचे नाही व आपल्या वकिलीवरच सगळे लक्ष केंद्रित करायचे त्यांनी ठरवले होते. पण एक क्षण असा आला, की त्यांच्यातील संवेदनाक्षम समाजसुधारकाला डोळ्यांसमोर राजरोसपणे चालू असलेल्या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक करणे अशक्य झाले. याला निमित्त झाले अशोक सहकारी साखर कारखान्याचे. श्रीरामपूर तालुक्यातील हा दुसरा सहकारी साखर कारखाना. १९५७च्या सुमारास सुरू झालेला. तिथल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या रावसाहेबांच्या कानांवर सतत येत होत्या. कारखान्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व सरकारी योजनांकडे अजुनी चालतोची वाट... २६६