पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझ्याचसाठी फुललो नसे मी 'स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः' असे एक गीतावचन आहे. आपला जो 'स्वधर्म' आहे तो माणसाने सोडू नये, दुसऱ्या कोणासारखे बनायचा प्रयत्न करू नये, असा बहुधा त्याचा आशय असावा. पण काही जण सोयीस्करपणे त्याचा अर्थ 'आपण बरे, की आपले काम बरे' असा लावतात! 'मला काय त्याचे!' ही या आत्मकेंद्रित माणसांची वृत्ती असते. दुर्दैवाने बहुसंख्य समाज तसाच असतो. पण लहानपणापासून झालेल्या सामाजिक बांधिलकीच्या संस्कारांमुळे, अगदी सुरुवातीची उमेदवारीची काही वर्षे सोडली, तर आपली वकिली चालू असतानाही रावसाहेबांनी आपली सामाजिक जबाबदारी कधी दुर्लक्षित केली नाही. सामाजिक ऋणानुबंध त्यांनी कसोशीने निभवले. पन्नासचे व साठचे दशक हा ग्रामीण महाराष्ट्रातील सहकारी चळवळीच्या रुजुवातीचा कालखंड होता. साहजिकच सहकारी चळवळीतील बऱ्यावाईट प्रवृत्तींकडे रावसाहेबांचे बारकाईने लक्ष असे. महाराष्ट्रात, किंबहुना भारतात, उभ्या राहिलेल्या सहकारी चळवळीने त्यापूर्वी सलग दोन-तीनशे वर्षे चालू असलेल्या पश्चिम युरोपातील सहकारी चळवळीपासून बरीच प्रेरणा घेतली होती. विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण - आरोग्य, स्त्रीमुक्ती- न्यायदानयंत्रणा, साम्यवाद- समाजवाद अशा आधुनिक जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आपण पश्चिम युरोपातील प्रेरणास्रोत समोर ठेवूनच मार्गक्रमण करत आलो आहोत. युरोपात आपल्या खूप पूर्वी प्रबोधनपर्व आल्यामुळे हे तसे स्वाभाविकही होते. पण त्याचबरोबर आपल्या विशिष्ट समाजवैशिष्ट्यांनुसार इथल्या सहकारी चळवळीला लाभलेले रूप अनेक बाबतीत वेगळेही झाले. उदाहरणार्थ, पाश्चात्त्यांची सहकारी चळवळ जवळजवळ पूर्णत: सरकारपासून स्वतंत्र अशी राहिली, पण आपली सहकारी चळवळ ही फार मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्ज, अनुदाने, योजना व परवाने यांच्यावर अवलंबून राहिली व त्यामुळे तिला सतत सरकारशी जुळवूनच माझ्याचसाठी फुललो नसे मी २६५