पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नैतिक सदसद्विवेकाचीच आवश्यकता आहे. म्हणजेच हा नुसती फी कमीजास्त घेण्याचा प्रश्न नसून वकिली व्यवसायातील नीतिमूल्यांचा हा प्रश्न आहे. वकिलीच्या व्यवसायाने रावसाहेबांना खूप काही दिले. ज्याच्या डोक्यावर दहा हजार रुपयांचे इनाम होते, ज्याला दिसल्याक्षणी गोळी घालावी असे पोलिसांना आदेश होते, जो तीन वर्षे भूमिगत अवस्थेत इकडून तिकडे लपतछपत भटकत होता अशा एका तरुणाला या व्यवसायाने स्थैर्य दिले. साम्यवादापासून भ्रमनिरास झालेल्या जिवलग मित्रांनी पाठ फिरवलेल्या, आईवडलांचा फारसा आधार नसलेल्या, सच्च्या पण रित्या मनाच्या कार्यकर्त्याला जगण्यासाठी उद्दिष्ट पुरवले. सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली. आयुष्यात प्रथमच स्वकष्टार्जित अशी समृद्धी दिली. इतकी समृद्धी, की त्या समृद्धीचाही तो त्याग करू शकेल. रावसाहेबांनीही वकिली व्यवसायाला खूप काही दिले. घड्याळाकडे न पाहता दिवस दिले, रात्री दिल्या; अविरत परिश्रम दिले. आयुष्यातील ऐन उमेदीची अशी तीस-पस्तीस वर्षे दिली. अगणित गोरगरिबांना न्याय मिळवून दिला; बसभाड्यासाठीचाही एक रुपया ज्याच्या खिशात नव्हता त्यालाही जगण्याचे बळ दिले आणि पाच रुपयाची नोटही काढून दिली. पक्षकाराचे सुखदुःख त्यांनी आपले सुखदुःख मानले; काका, मामा, नाना, भाऊ, दादा अशा जवळिकीच्या नावाने त्याला हाक मारली; त्याला मिळणाऱ्या न्यायात आपलाही आनंद सामावून घेतला. पक्षकाराच्या पैशावर त्यांचा कधीच डोळा नव्हता; म्हणूनच त्याची आपुलकी आणि श्रद्धा त्यांनी आयुष्यभरासाठी मिळवली. कोणाची कृष्ण कृत्ये झाकण्यासाठी म्हणून रावसाहेबांनी कधीच काळा डगला परिधान केला नाही. उलट आपले वकिली कौशल्य त्यांनी अन्यायग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठीच वापरले. "The strong and the rich can anyway protect themselves, law is for the protection of the weak and the poor," ("शक्तिमान आणि श्रीमंत स्वतःचे रक्षण कसेही करू शकतात, कायदा असतो तो दुर्बळ आणि गरीब यांच्या रक्षणासाठी.") असे एक न्यायसभेतील मार्गदर्शक तत्त्व मानले गेले आहे. रावसाहेबांच्या वकिलीपर्वात या आदर्शाचे प्रत्यंतर पदोपदी येते. अजुनी चालतोची वाट... २६४