पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेबांचे विचार आणि कृती यांत कधीच विसंगती आढळणार नाही. त्यांनी कुणाकडूनही अनाठायी फी घेतली नाही. आपण एक नामवंत वकील आहोत किंवा समोरची पार्टी भरपूर पैसा देणारी आहे, या गोष्टींचा त्यांनी कधीही फायदा घेतला नाही. कुणाची पैशासाठी अडवणूक केली नाही. 'मिळताहेत पैसे, तर घ्या!' अशी लुबाडणूक त्यांनी कधीही केली नाही. इतरांना आदर्शभूत वाटावा असा हा कायदेपंडित. रावसाहेब अनेक सहकारी संस्थांचे कायदेशीर सल्लागार होते. इथेदेखील त्यांनी नीती (एथिक्स) हा भाग महत्त्वाचा मानला. त्यांनी स्वतःच स्वतःला काही नीतितत्त्वांनी बांधून घेतले होते. सत्ता, संपत्ती या विषयांचा लोभ त्यांच्या मनात कधीच निर्माण होऊ शकला नाही. अगदी तशी संधी येऊनही." श्रीरामपूर बार असोसिएशनच्या कामात एक व्यावसायिक कर्तव्य म्हणून रावसाहेबांनी बराच सक्रिय भाग घेतला. वकिली सुरू केल्यानंतर दोन-तीन वर्षांतच ते तिचे सेक्रेटरी बनले. त्यावेळी असोसिएशनचे सदस्य पंधरा-वीसच होते. पुढे ही संख्या वाढत वाढत शंभरसव्वाशेवर गेली. लवकरच असोसिएशनच्या अध्यक्षपदी रावसाहेब निवडून आले. दरवर्षी ही निवडणूक होत असे आणि दरवर्षी रावसाहेबच बिनविरोध निवडून येत. सलग चौदा वर्षे ते असोसिएशनचे अध्यक्ष राहिले. या कालावधीतला एक मानबिंदू म्हणजे श्रीरामपूर न्यायालयाची नवी इमारत. जुनी इमारत खूपच जुनी आणि गैरसोयीची होती. नवी इमारत व्हावी ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती, पण सरकारकडून प्रतिसाद मिळत नव्हता. रामराव आदिक हे श्रीरामपूर तालुक्यातले. महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल म्हणून नेमणूक झाल्याबद्दल असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार केला गेला. नामदार बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते हा सत्कार झाला. समारंभातील रावसाहेबांचे भाषण अंतुलेंना खूप आवडले. "ग्रामीण भागात इतका बुद्धिमान आणि प्रभावी वक्तृत्वशैली असलेला वकील माझ्या पाहण्यात नाही," असे उद्गार अतुलेंनी आपल्या भाषणात काढले. त्यानंतर रावसाहेबांना लिहिलेल्या एका पत्रातही त्यांनी तेच म्हटले. या निमित्ताने रावसाहेबांची बॅ. अंतुलेंबरोबर मैत्री जुळली. योगायोगाने त्यावेळी अंतुले कायदा व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. पुढे ते मुख्यमंत्रीही बनले. नव्या इमारतीची असोसिएशनची जुनी मागणी मुख्यत: त्यांच्याच पाठबळामुळे मंजूर झाली. "प्रत्येक गोष्ट रावसाहेबांना विचारून करा, " अशी स्पष्ट सूचना बॅ. अंतुलेंनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती. सरकारकडे न्यायालयीन इमारतीचा अजुनी चालतोची वाट... २६२