पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅड. चुडीवाल म्हणतात : "माझ्यासारख्या अतिशय ज्युनिअर अशा वकिलावर रावसाहेबांनी दाखवलेला विश्वास हेच मुळी माझ्यासाठी अप्रूप होते. केवळ त्यांच्याच प्रेरणेने, त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी माझ्या वकिली व्यवसायाचा इतका मोठा पल्ला यशस्वीपणे पार करू शकलो. मोठमोठे दावे, मोठमोठ्या केसेस त्यांनी अत्यंत विश्वासाने मला चालवायला दिल्या. काही दाव्यांमध्ये, काही केसेसमध्ये मला अपयश आले म्हणून ते माझ्यावर कधीही रागावले नाहीत, चिडले नाहीत अथवा माझ्याबद्दल त्यांनी कधीही कुठेही उणा शब्द काढला नाही. रावसाहेब मला भरभरून देतात, माझ्यावर भरभरून प्रेम करतात म्हणून अनेकांना माझ्याबद्दल नेहमी असूया वाटत आली आहे. एकदा एका वकील महाशयांशी रावसाहेब बोलत असताना त्यांचे शब्द माझ्या कानावर पडले. 'माझा ज्युनिअर चुडिवाल याच्याबद्दल मला अभिमान वाटतो.' हे शब्द ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.” त्यांचे एक सहकारी ॲड. गोविंदराव आदिक पुढे एक वकील म्हणून खूप नामांकित झाले, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष बनले. राजकारणातही त्यांनी मोठे नाव कमावले. खासदार, मंत्री, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले. रावसाहेबांचे काम त्यांनी जवळून पाहिले आहे. ते लिहितात : " "रावसाहेबांचा 'ज्युनिअर' म्हणून मी काम करायला लागल्यावर आम्ही सिलिंगच्या संदर्भातील केसेस घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी पुण्याला जावे लागे. या श्रीरामपूर-पुणे प्रवासात त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू बघायला मिळाले. रावसाहेब प्रतिकूल परिस्थितीशी झगडून वर आलेले आहेत. खडतर प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले आहे. आर्थिक बिकटतेतून वाट काढावी लागली आहे. सुबत्ता आली, की अशा माणसाचा स्वभाव बदलू लागतो. पण रावसाहेबांचे तसे झाले नाही. एक प्रसंग आठवतो. रावसाहेब त्यांचे कपडे पुण्यात 'पतंगे टेलर' कडून शिवून घेत असत. एकदा आम्ही कामानिमित्त पुण्यात गेलो होतो. रावसाहेब, अॅड. भास्कर कुंदे आणि मी. रावसाहेबांना नवीन कपडे शिवून घ्यायचे होते. त्यांनी त्यांचे कपडे घेतले त्याचवेळी आग्रह करून त्यांनी मलाही शर्टाचे कापड घेतले. अगदी जबरदस्तीने. मी संकोचाने 'नको' म्हणत होतो. पण शेवटी ते म्हणाले, 'तुम्ही माझे धाकटे भाऊ आहात ना? मग तुम्ही ऐकलेच पाहिजे. या कापडाचा शर्ट तुम्ही घेतलाच पाहिजे.' अशा प्रेमळ आग्रहापुढे कोण शरण जाणार नाही ? त्यानंतर कित्येक वर्षे मी तो शर्ट जपून ठेवला होता. अंगाला येईनासा झाला तरी. प्रेम व्यक्त करण्याची त्यांची ही अशी न्यारी तन्हा. बहरलेली वकिली... २६१