पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अप्रूप वाटले. देहभान हरपून खूप वेळ ते तो 'चमत्कार' बघत व ऐकत होते. या संगीतप्रेमात पुढे यथावकाश चळवळीच्या गाण्यांची भर पडली. गाण्यांमुळे गेयतेची एक आवड आपोआपच निर्माण होते आणि पुढे रावसाहेब एक प्रभावी वक्ते बनले यामागेही कुठेतरी ही गेयतेची आवड आहे. गाण्याप्रमाणेच वक्तृत्वालाही एकप्रकारची लयबद्धता असते आणि रावसाहेबांच्या वक्तृत्वात ती जाणवते. लहानपणी झालेला संगीताचा तो संस्कार रावसाहेबांच्या मनाचा एक कोपरा आजही कुठेतरी व्यापून आहे. आपल्या जेमतेम चार-पाच महिन्यांच्या पणतीला मांडीत घेऊन जेव्हा ते 'इथे इथे बस रे मोरा, तुला देतो चारा, चारा खा, पाणी पी, आणि भुर्रकन उडून जा' किंवा 'या बाळानो या रे या, लवकर भरभर सारे या ' यासारखी बालगाणी तालासुरात म्हणतात, अगदी तल्लीन होऊन आणि आजूबाजूला बरीच माणसे आहेत याचा जराही संकोच न बाळगता म्हणतात, तेव्हा तो बालपणाचा संगीताचा संस्कार जाणवतो. संगीताप्रमाणेच रावसाहेबांच्या मनावर बालपणीच झालेले दुसरे दोन संस्कार म्हणजे शारीरिक श्रमाची लाज न वाटणे आणि निसर्गप्रेम. हे दोन्ही संस्कार तसे एकमेकांच्या हातात हात घालूनच होत गेले. सगळ्याच शेतकरी कुटुंबांमध्ये त्याकाळी स्वत:च्या हातांनी कामे करायची परंपरा होती. म्हणजे गडीमाणसे असत, विशेषत: पाटलांच्या घरात तर नक्कीच असत पण शरीरश्रम कोणालाच चुकले नव्हते. तत्कालीन ग्रामीण भागात यंत्रे तर सोडाच पण पुरेशी साधी-साधी अवजारेही उपलब्ध नसत; सुबत्ता कितीही असली, तरी सगळा भर शरीरश्रमावरच असायचा. नांगरणी, वखरणी, पेरणी, खुरपणी, बांधणी, कोचुळे उभे करणे, मोडणी, मळणी, खळे लावणे, घास कापणे, पाणी भरणे, भाजीपाला काढणे ही सर्व शेतातली कामे रावसाहेब बालपणापासूनच करू लागले. उन्हाळ्यात नदीच्या बंधाऱ्यातले पाणी खाली गेले, की शेतातल्या पाटाला पाणी येत नसे. अशा वेळी बंधाऱ्यातले पाणी उपसून पाटात टाकावे लागे; त्यानंतरच तो पाण्याचा प्रवाह पिकापर्यंत वाहत जायचा. हे काम खूपच कष्टाचे असे व पाणी उपसणारे अगदी घामाघूम होऊन जात, हात भरून येत. शेतातले खळे तयार झाले की रावसाहेब आधी आजोबांबरोबर व पुढे वडलांबरोबर खळ्यावरच झोपायला जात. मोकळ्यावरचे आकाश न्याहाळता न्याहाळता गप्पा होत. त्यामुळे त्यांना लहानपणीच ग्रह-ताऱ्यांची ओळख झाली. अथांग आभाळाखाली ते निवांतपणे पडून राहणे रावसाहेबांना खूप आवडे. गुजर नावाची त्यांची एक म्हैस होती. मोकळा वेळ मिळाला की रावसाहेब पाडळीतल्या पाऊलखुणा... २५ -