पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चूक झालेली दिसते आहे. म्हणजे एखादे शून्य कमी पडल्यासारखे वाटते.” त्यांना असे का वाटले हे पुढच्या संभाषणातून स्पष्ट झाले. रावसाहेबांवर हे काम सोपवण्यापूर्वी मुंबईच्या एका बड्या सॉलिसिटर फर्मकडे ते कंपनीने सोपवले होते. त्यांनी केलेला लांबलचक मसुदा कंपनी अधिकाऱ्यांना पसंत पडला नव्हता. मसुद्यात मग बऱ्याच दुरुस्त्याही केल्या गेल्या; पण तरीही तो मनाजोगता होईना. शेवटी तो बाजूलाच टाकावा लागला. पण सॉलिसिटरचे पाच हजार रुपये अधिक इतर खर्चाचे भरमसाट बिल मात्र कंपनीला द्यावे लागले. त्यानंतर हेच काम रावसाहेबांनी समाधानकारकरीत्या केले; पण त्यांचे बिल सॉलिसिटरच्या बिलाच्या तुलनेत अगदीच नगण्य होते. कुठे पाच हजार आणि कुठे दोनशे ! म्हणूनच बिल करताना रावसाहेबांची काही चूक, तर झाली नसेल ना अशी शंका कंपनी अधिकाऱ्यांना आली. अशा वेळी बऱ्याच वाढीव रकमेचे बिल देणे रावसाहेबांना सहज शक्य होते. पण रावसाहेबांनी तो मोह टाळला. मुळात हे काम घेण्यामागे त्यांच्यातल्या वकिलापेक्षा त्यांच्यातला समाजसुधारक अधिक कारणीभूत होता. या लिफ्ट योजनेचा उद्देश कालव्याचे पाणी जागोजागी पंप्स व पाइपलाइन यांचा वापर करून सगळ्या शेतांपर्यंत पोचवणे हा होता. सुरुवातीचा भांडवली खर्च कंपनी करणार होती, पण उसाच्या पेंमेटमधून तो वसूल झाल्यावर लिफ्टवर शेतकऱ्यांचीच मालकी होणार होती. याबाबतीत कंपनीबरोबरचा व्यवहार निश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमुखाने रावसाहेबांची निवड केली होती. त्या कंपनीचे वकीलही रावसाहेबच आहेत हे स्पष्ट झाल्यावरही शेतकऱ्यांनी आपला निर्णय बदलला नव्हता. दोन्ही बाजूंनी आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवला असताना आपणही आपल्या वकिली कामाचे अगदी माफक पैसे घेणेच योग्य ठरेल अशी रावसाहेबांची भूमिका होती. त्यांच्या या तत्त्वनिष्ठेमुळेच महाराष्ट्र शुगरप्रमाणेच बेलापूर शुगरनेही आपले कायदा सल्लागार म्हणून पुढे त्यांची नेमणूक केली. व्यवसायातून निवृत्त होईपर्यंत रावसाहेबच या पदावर होते व या सर्व कालावधीत त्यांचे वरिष्ठ व्यवस्थापनाशी उत्तम संबंध राहिले. एकेकाळी पूर्णवेळ कम्युनिस्ट कार्यकर्ता असलेल्या रावसाहेबांनाही व्यवस्थापनाशी असे सामोपचाराने जुळवून घेणे साधले यातून त्यांचा एकूण वकिलीचा व्यवहार किती चोख होता हे अधोरेखित होते. वकिली व्यवसायातील रावसाहेबांच्या यशाची कमान ही सतत चढतीच राहिली. त्यामुळेच महाराष्ट्र शुगर व बेलापूर शुगर या खासगी कारखान्यांप्रमाणेच प्रवरा सहकारी साखर कारखाना, अशोक सहकारी साखर कारखाना, तालुका बहरलेली वकिली... २५९