पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कार्यकर्ते उत्साहातच होते. पण ऊसतोड जास्त दिवस बंद ठेवता येत नाही; पिकाला पाणी देण्याचा प्रश्न असतो, तसेच इतरही प्रश्न असतात. कारखान्याने ऊस तोडून नेला, की हातात कर्जफेडीसाठी रोख पैसा येतो. त्यामुळे ऊस कधी कारखान्यात जाईल याबाबत शेतकरी उत्सुक असतात. शेतकरी एखाद्या आठवड्याच्यावर दम धरणार नाहीत आणि तोपर्यंत समजुतीचा मार्ग निघाला नाही तर संघटनेची फजिती होईल हे रावसाहेबांच्या लक्षात आले होते. सभेनंतर शेतकरी आपापल्या घरी निघून गेले आणि आता पुढचा मार्ग काय काढायचा याची आपापसात चर्चा करत नेतेमंडळी थांबली. तेवढ्यात कंपनीच्या ऑफिसमधून नेत्यांना बोलावल्याचा निरोप आला. कंपनीचे चेअरमन दादाशेठ डहाणूकर हे मुंबईहून तिथे आले असल्याचे समजले. त्यांच्या चेंबरजवळ जाऊन नेतेमंडळी थांबली. काही वेळाने कंपनीचे मॅनेजर बाहेर आले. त्यांनी निरोप आणला, की दादाशेठ फक्त रावसाहेब शिंदे यांनाच भेटू इच्छितात. रावसाहेबांनी विनंती केली, की आम्हां सगळ्यांनाच एकत्र भेटीची संधी मिळावी. मॅनेजर बाहेर आले, ते स्पष्ट नकार घेऊनच. शेवटी रावसाहेबांनी एकट्यानेच डहाणूकरांची भेट घ्यावी असे ठरले. "सर्वांची इच्छा असेल तर मी मालकाला भेटण्यास जातो, नाही तर नको," असे ते नेतेमंडळींना स्पष्टपणे बोलले. कारण मालकाला एकट्याने भेटताना भ्रष्टाचाराची खूप शक्यता असते. पण रावसाहेबांवर सर्व शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास होता. सर्वांनी होकार दिला. दादाशेठ यांची व त्यांची ही पहिलीच भेट. रावसाहेबांनी त्यांच्या ऑफिसात प्रवेश केला. त्यांनी उभे राहून स्वागत केले. त्यांचे व्यक्तिमत्त्व एकदमच रुबाबदार. गोरेपान. मूळ प्रश्नांवर चर्चा सुरू झाली. ऊसतोड बंद राहणे शेतकऱ्यांच्या व कंपनीच्याही हिताचे नाही, कंपनी व कऱ्यांमध्ये विरोधाचे व ताणतणावाचे वातावरण असणे हे हितावह नाही, असे विचार रावसाहेबांनी व्यक्त केले. तसेच "विरोधासाठी विरोध करणे हे मला मुळीच पसंत नसून सामोपचारातून मार्ग निघावा," असेही ते म्हणाले. हे विचार ऐकून दादासाहेबांना समाधान वाटल्याचे दिसले. त्यांच्या डोळ्यांपुढे संप करणारे, भांडण ताणून धरणारे नेते असावेत. खुलासे प्रतिखुलासे, उत्तरे- प्रतिउत्तरे अशा तऱ्हेने बरीच चर्चा झाली. दोन्ही बाजूंनी थोडे मागे, थोडे पुढे होऊन चर्चेत प्रगती झाली. शेवटी प्रत्येक टनामागे सात रुपये इतकी भाववाढ द्यायची अशी तडजोड निश्चित झाली. दादाशेठ डहाणूकर हे अतिशय उमद्या आणि सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. आपसात तडजोड घडवून आणण्यामध्ये त्यांनी मनाचे चांगलेच औदार्य बहरलेली वकिली... २५७