पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब म्हणतात, "पुढे काही वर्षे गेली. आम्हांला निरोप आला, की 'चंदूबाई बऱ्याच आजारी आहेत. तुम्हा दोघांना भेटण्याची त्यांची खूप इच्छा आहे.' आम्ही दोघे चंदूबाईंच्या घरी गेलो. चंदूबाईंची अवस्था पाहून वाईट वाटले; त्या सुधारण्याची आशा नव्हती. आम्हांला पाहून चंदूबाईंच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तथापि केवढेतरी समाधान त्यांना वाटले. शशीचे हात त्यांनी मोठ्या प्रेमाने बराच वेळ हातात धरले. 'मम्मी, पप्पा तुम्ही मला भेटायला आला. मला आता जगण्याची आशा नाही. पण तुमच्या भेटीमुळे मी आता सुखाने जाईन.' चंदूबाई गेल्या. आमच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या. आम्हांला पप्पा, मम्मी ही एक प्रकारची पदवी देऊन त्या गेल्या. " रावसाहेबांच्या असंख्य पक्षकारांच्या कहाण्या तशा वेधक आहेत; स्थलाभावी केवळ काहींचाच उल्लेख इथे केला. शेवटी एका पक्षकाराविषयी लिहावेसे वाटते ते म्हणजे महाराष्ट्र शुगर मिलचे दादाशेठ डहाणूकर. त्यांचा व रावसाहेबांचा पहिला संपर्क मात्र वकिलीच्या माध्यमातून नव्हे तर आंदोलनाच्या माध्यमातून आला. बेलापूर शुगर मिल्स व महाराष्ट्र शुगर मिल्स हे दोन श्रीरामपूर तालुक्यातील खासगी साखर कारखाने सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ते उसाला नेहमीच कमी भाव देत. त्यावरून शेतकऱ्यांमध्ये खूप नाराजी होती. त्या संदर्भात लढा देण्यासाठी भागवतराव खंडागळे, एस. व्ही. कुलकर्णी, दत्तू पाटील थोरात व इतर काही जणांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एक संघटना उभारली होती. तिला रावसाहेबांनी नेतृत्व द्यावे अशी त्या सगळ्यांची खूप इच्छा असायची. खरे तर श्रीरामपुरात येऊन वकिली सुरू केल्यापासून कुठल्याही स्वरूपाच्या आंदोलनापासून रावसाहेब दूरच हिले होते; कारण - - वकिलीच्या माध्यमातूनही आपण भरपूर समाजसेवा करू शकतो याविषयी त्यांची खात्री पटली होती. पण या संघटनेच्या लढ्यात मात्र ते ओढले गेले. स्वत: वकिलीबरोबरच एक ऊस उत्पादक शेतकरी असल्याचा हा कदाचित परिणाम असू शकेल. साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्याच्या बेतात होता. योग्य भावाची महाराष्ट्र शुगर मिल्सच्या व्यवस्थापनाकडे मागणी करण्यात आली. ती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. लगेच ऊस उत्पादकांचा मोठा मेळावा महाराष्ट्र शुगर कंपनीजवळच्या मैदानात घेण्यात आला. रावसाहेबांचे मुख्य भाषण झाले. कंपनीला ऊस द्यायचा नाही असे त्यांनी सांगितले आणि त्यासाठी 'ऊसतोड बंद करा' अशी घोषणा त्यांनी दिली. शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सगळे अजुनी चालतोची वाट... २५६