पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

टेकावडे बिल्डिंगीत फळे विकायला त्या जवळपास रोजच येत. वेळ असला तर शशिकलाताईंशी पाच मिनिटे गप्पा मारत. शिंदेंची पहिली कन्या शुभा तेव्हा लहान होती. चंदूबाई अशाच तिच्या हातावर एखादे फळही ठेवत. रावसाहेब वकील आहेत हे कळल्यावर एक दिवस त्यांना चंदूबाईंनी आपली कर्मकहाणी ऐकवली. त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे कागद रावसाहेबांनी मागवले. त्यांचा अभ्यास केल्यावर एकूण परिस्थितीची त्यांना कल्पना आली. जमिनीचा व घराचा कबजा मिळावा आणि नुकसानभरपाईही मिळावी म्हणून त्यांनी कोर्टात दावे दाखल केले. दोन-तीन वर्षे केस रखडली, पण शेवटी निकाल चंदूबाईंच्या बाजूने लागला. सर्व खर्चासकट त्यांचे दोन्ही दावे मंजूर झाले. त्यांचा आनंद गगनात मावेना. पुढे चंदूबाईंची मुले मोठी झाली. काही ना काही उद्योगाला लागली. एका ला एस. टी. मध्ये आणि एकाला जिल्हा परिषदेमध्ये रावसाहेबांनीच नोकरीला लावले. चंदूबाईंची परिस्थिती आता चांगलीच सुधारली. त्यांच्या डोक्यावरचे पाटीचे ओझे गेले आणि त्यांची घरोघर फिरण्याची पायपीट थांबली. थोडेसे मानसन्मानाचे जिणेही त्यांच्या नशिबी आले. प्रसंगपरत्वे चंदूबाई मुद्दाम त्यांच्या भेटीला येत असत. रावसाहेबांना व शशिकलाताईंना त्या पप्पा, मम्मी म्हणत. ते ऐकून तेथे असलेल्या लोकांची करमणूकही होई. एक मुलगा चांगला वागत नाही, उद्धटपणे बोलतो, व दुसरा एकदा मारायला अंगावर धावला, अशी तक्रार घेऊन एकदा चंदूबाई त्यांच्याकडे आल्या. १९७६नंतरची ही घटना. चंदूबाईंना त्यांनी दिलासा दिला व एक दिवस चंदूबाईंच्या सगळ्या मुलांना निरोप देऊन भेटायला बोलावले. चंदूबाईही आल्या. सर्वजण घरापुढील ओट्यावर बसले. मुलांना बरेच समजावून सांगून शेवटी त्यांना रावसाहेबांनी सक्त ताकीद दिली. "पुन्हा आईला त्रास देण्याची तक्रार आली तर पोलिसांनाच कळवीन,” म्हणून धाकही घातला. मुले त्यांच्या पाया पडून " पुन्हा असं करणार नाही" म्हणून सांगत होती. रावसाहेबांनी त्यांना "माझ्या पाया पडण्याऐवजी आईच्या पाया पडा" म्हणून सांगितले. चंदूबाईंनी त्यांचे सगळे ऐकून घेऊन त्यांना भलतीच भीती घातली. त्या म्हणाल्या, "मेल्यांनो! आता जर का पप्पांचं ऐकलं नाहीत तर शेत आणि घर ही सगळी मिळकत मी माझ्या पप्पा, मम्मींनाच देऊन टाकीन. मग तुम्ही बसा बोंबलत! नाहीतरी त्यांनीच मला सगळं कमावून दिलं आहे." चंदूबाईंकडून वकील म्हणून रावसाहेबांनी एक पैसाही चंदूबाईंचे हे उद्गार ऐकून त्यांच्या मनात आले, की चंदूबाईंची ही केवढी आभाळाएवढी फी आपल्याला मिळाली! घेतली नव्हती, पण बहरलेली वकिली... २५५