पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंत्यसंस्कारांसाठी डॉक्टरबाईंचे कुटुंबीय आले होते व त्यांनी त्यावेळी एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली. डॉक्टरबाई कधीकधी केरळमध्ये आपल्या मूळ गावी राहायला जात तर कधीकधी इंग्लंडमधल्या मुलाकडे वा मुंबईतल्या मुलाकडे जात, पण एरवी त्यांचा कायमस्वरूपी मुक्काम श्रीरामपुरातच असे. शेवटीशेवटी त्यांना रक्तदाबाचाही विकार जडलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी श्रीरामपुरात एकट्याने न राहता केरळमध्ये आपल्या गावी राहावे असे सर्व कुटुंबीयांनी त्यांना एका पत्राद्वारे कळवले होते. त्याला पाठवलेल्या उत्तरात डॉक्टरबाईंनी लिहिले होते, "मी इथे एकटी आहे असे तुम्ही का म्हणता ? माझे शशिकलाताई आणि रावसाहेब इथे नाहीत का? तेव्हा माझ्या इथे राहण्याची तुम्ही मुळीच काळजी करू नये. इथे माझी काळजी घेणारे आहेत व मी इथेच राहू इच्छिते. " या पत्रव्यवहाराची काहीच कल्पना रावसाहेबांना नव्हती. अंत्यसंस्कारप्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी हे पत्र रावसाहेबांना दाखवले. त्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना रावसाहेब म्हणतात, "त्यावेळी आम्ही खूप दुःखी झालेलोच होतो, पण त्या पत्राने तर आमचे अंतःकरण हेलावून गेले. डॉक्टरबाईंनी आम्हां उभयतांना 'माझे शशिकलाताई आणि रावसाहेब' म्हणत इतक्या आपुलकीचे स्थान दिले होते हा आम्हां उभयतांना हिमालयाएवढ्या उंचीचा लाभ होता. याहून अधिक मूल्यवान अशी कोणती फी मला मिळू शकणार होती ?" डॉक्टरबाईंची तिन्ही मुले आपापल्या कुटुंबासह आजही जमेल तेव्हा श्रीरामपूरला येतात आणि शिंदे कुटुंबाबरोबरच राहतात. वकील आणि पक्षकार यांच्यात असे जिव्हाळ्याचे नाते निर्माण होणे आणि असे वर्षानुवर्षे टिकून राहणे हे दुर्मिळच. कधीकधी काही पक्षकार अगदी गरीब असत. खरे तर या व्यक्ती रूढ अर्थाने पक्षकार म्हणून संपर्कात आलेल्याच नसत, पण त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून रावसाहेब त्यांच्या केसेस लढवत. फी द्यायची त्यांची ऐपत नसे; त्यांनी ती द्यावी अशी अपेक्षाही नसे; पण अशांच्या केसेसही रावसाहेब कष्टपूर्वक लढवत. अशांपैकीच एक म्हणजे चंदूबाई देवकर या श्रीरामपुरातल्या विधवा महिला. डोक्यावर फळांची पाटी घेऊन या दारोदार फिरायच्या. केळी, पेरू, बोरे, पपई वगैरे विकायच्या. दिवसभर भटकंती केल्यावर चार पैसे सुटत. त्यात चार मुलांचा सांभाळ कसाबसा करायच्या. तशी त्यांची शेती होती; बऱ्याच खोल्या भाड्याने देता येतील अशी स्वत:च्या मालकीची एक चाळही होती. पण नवरा मेल्यानंतर त्याच्याच एका मित्राने त्या शेतजमिनीचा व चाळीचा बेकायदा कबजा घेतला होता. बिचाया चंदूबाई अगतिकतेने सगळे बघत होत्या. रावसाहेब राहत त्या अजुनी चालतोची वाट... २५४