पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करून भरले व ट्रकचे भाडेसुद्धा स्वतःच दिले. एक दिवस डॉक्टरबाईंचा रावसाहेबांना फोन आला. ते नुकतेच कोर्टातून घरी परतले होते. आवाजावरून त्या खूप गडबडलेल्या वाटत होत्या, म्हणून रावसाहेब घाईघाईने त्यांच्याकडे गेले. गेल्या गेल्या डॉक्टरबाईंनी एक लहानशी पिशवी त्यांना दाखवली व त्यात पंच्याहत्तर हजार रुपये असल्याचे सांगितले. ते कसले याचा खुलासाही त्यांनी लगोलग केला. दवाखान्याची व हॉस्पिटलची जागा त्यांनी नुकतीच घरमालकाला खाली करून दिली होती. व्यवसाय बंद करायचा निर्णय त्यांनी पूर्वीच घेतला होता. प्रत्यक्ष जागा खाली करण्यापूर्वीच घरमालकाने एका व्यापायाला ती जागा भाड्याने देण्याचा करार केला होता व त्या बदल्यात भली मोठी रक्कमही पागडी म्हणून घेतली होती. त्या पागडीतील भाडेकरूच्या हिश्श्याचा एक भाग म्हणून ही रक्कम डॉक्टरबाईंकडे पाठवली गेली होती. पागडीचा उरलेला हिस्सा लौकरच पाठवला जाईल असा निरोपही होता. हा काळा पैसा कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरबाईंना नको होता. किंबहुना तो दिला गेला म्हणूनच त्या खूप अस्वस्थ झाल्या होत्या. रावसाहेबांच्या आग्रहामुळे त्यांनी आपल्या मुलाला, रेव्हरंड विजूला, फोन लावला. "हे काळे पैसे आपल्याला नकोत," असे त्यानेही स्पष्टपणे सांगितले. दुसऱ्या दिवशी हे सारे पैसे रावसाहेबांनी घरमालकाकडे परत केले तेव्हा कुठे डॉक्टरबाईंचा जीव शांत झाला. हे कुटुंब खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचरण कसे करते, 'बोले तैसा चाले' या उक्तीनुसार कसे वागते याचा हा प्रत्यय रावसाहेबांना भारावून टाकणारा होता. डॉक्टरबाईंची दवाखान्याची व प्रसूतिगृहाची जागा तळमजल्यावर होती. ती विनाअट खाली करून देताना त्या राहायच्या ती पहिल्या मजल्यावरची जागा त्यांनी व मुलाबाळांनी कितीही काळ आपल्याकडे भाड्याने ठेवावी अशी बोली चरमालकांनी केली होती. त्या बोलीला मात्र घरमालक जागले नाहीत! रावसाहेब म्हणतात, "डॉक्टरबाईंनी एवढी मोठी रक्कम परत केली याचा तर जणू त्यांना विसरच पडल्यासारखं झालं. कोठे डॉक्टरबाईंची उच्च नीतिमत्ता आणि कोठे ही शब्दाला न जागणारी मनोवृत्ती !” काळाच्या ओघात एक दिवस श्रीरामपुरात राहत असतानाच डॉक्टरबाई हे जग सोडून गेल्या. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लांबूनलांबून लोक आले होते. शहरात म्युनिसिपल हॉलमध्ये रावसाहेबांनी श्रद्धांजलिसभा आयोजित केली होती. अण्णासाहेब शिंदेही सभेला हजर होते. अभूतपूर्व अशी गर्दी उसळली होती. ख्रिश्चन धर्मातल्या प्रार्थनेने सभेचा शेवट झाला. पावित्र्याने भारावलेल्या अशा वातावरणात पार पडलेली ही सभा अविस्मरणीय अशी झाली. बहरलेली वकिली... २५३