पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

याच मुद्द्यावर डॉक्टरबाई निर्दोष असल्याचा निवाडा कोर्टाने दिला. रावसाहेबांच्या जिवात जीव आला. डॉक्टरबाईंपेक्षा त्यांच्यावरचेच दडपण जास्त होते. डॉक्टरबाईंच्या त्या परिसरात पाच-सहा मिळकती होत्या. कायद्याचे काही ना काही प्रश्न नेहमीच उद्भवत. ही सर्व कामे त्या रावसाहेबांवर सोपवत आणि रावसाहेबांनी ती जबाबदारी वर्षानुवर्षे चोखपणे पार पाडली. आपल्या कामाचा एक पैसाही कधी रावसाहेबांनी घेतला नाही. रावसाहेब म्हणतात, "त्यांचे वागणे - बोलणे आणि एकूणच त्यांची जीवनपद्धती इतकी उदात्त होती, की त्यांच्याकडून फी घ्यावी असे मला कधी वाटलेच नाही. मी फी घेतली नाही याबद्दल सुरुवातीला त्यांची व माझी बरीच चर्चा झाली. मी काही वेळ निरुत्तरही झालो. पण लगेच सावरून मी म्हणालो, 'डॉक्टरबाई, तुम्ही आमच्या घरी येता. माझी आई भेटली की तिला जिव्हाळ्याने कडकडून मिठी मारता. तिच्याशी हास्यविनोद करून तिला हसायला लावता. आणि डॉक्टर या नात्याने तिला धीरही देता. याची मी तुम्हांला किती फी द्यायची ते आधी सांगा, मग मी तुमची फी स्वीकारतो.' ह्या बोलण्याने डॉक्टरबाई एकदम गंभीर झाल्या. त्यांचे डोळे ओलसर झाले. ह्या प्रसंगानंतर आमच्यातल्या फीचा विषय विसर्जन पावला तो कायमचाच.' पुढे रावसाहेबांनी स्वत:चे नवीन घर बांधले तेव्हा घरासाठी भेट म्हणून डॉक्टरबाई एक खास टीपॉय केरळहून घेऊन आल्या. हत्तींच्या कळपाचे एक अतिशय सुंदर असे चित्र त्यावर कोरलेले आहे. अशी वस्तू थेट केरळहून श्रीरामपुरात स्वतः घेऊन येणे अवघड होते. पण रावसाहेबांवरच्या व त्यांच्या कुटुंबावरच्या प्रेमापोटी ते कष्ट त्यांनी आनंदाने घेतले. आजही शिंदे कुटुंबाच्या दिवाणखान्यात ते टीपॉय सन्मानाने विराजमान झालेले आहे आणि त्या रूपाने डॉक्टरबाईंची आठवण आजही ताजी आहे. डॉक्ट व त्यांच्या मुलांचे शिंदे कुटुंबीयांबरोबर अतिशय जिव्हाळ्याचे नाते जडले. अण्णासाहेबांच्या पत्नी हिराबाई यांचे बाळंतपण त्यांच्याच दवाखान्यात झाले. राजीव व संजीव या रावसाहेबांच्या दोन्ही मुलांचा जन्मही तिथलाच. यथावकाश डॉक्टरबाईंनी दवाखाना बंद करायचा निर्णय घेतला. आता वयही बरेच झाले होते. त्यांचा एक मुलगा राजू इंग्लंडमध्ये बडा डॉक्टर होता. त्याच्या शहा नावाच्या एका डॉक्टर मित्राने गुजरातमधल्या अतिशय दुर्गम अशा आदिवासी भागात एक हॉस्पिटल सुरू केले होते. त्याला त्या सेवाभावी कार्यात मदत म्हणून आपल्या हॉस्पिटलमधील इतक्या वर्षांत जमवलेले सर्व किमती सामान डॉक्टरबाईंनी देणगी स्वरूपात देऊन टाकले. शिवाय ते सामान गुजरातमध्ये पोचवण्यासाठी त्यांनी एक मोठा भाड्याचा ट्रक ठरवला, सर्व सामान ट्रकमध्ये व्यवस्थित पॅक अजुनी चालतोची वाट... २५२