पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोर्टकेस झाली आणि पुन्हा निकाल डॉक्टरबाईंच्या बाजूने लागला. ब्राह्मणेला हुसकावून लावण्यात आले आणि प्लॉटचा ताबा पुन्हा डॉक्टरबाईंकडे आला. कोर्टखर्चाचा बोजाही ब्राह्मणेनेच द्यावा असे कोर्टाने सुनावले. तो त्याच्याकडून वसूल करण्यासाठी दरखास्तीचे काम सुरू झाले. बाईंचा मोठा मुलगा विजू अब्राहम याने स्वतःला मिशनच्याच पूर्णवेळ सेवेसाठी वाहून घेतले होते. तो मुंबईला राहायचा. त्याच्या कानावर ही हकीकत गेली तेव्हा तो श्रीरामपूरला आला आणि "या गरीब गृहस्थाला आपण असा त्रास देणं बरोबर नाही; उलट आपण त्याला पैसे देऊन थोडीफार मदतच केली पाहिजे," असे रावसाहेबांना सांगू लागला. "गरिबाचा छळ करणं मलाही बरोबर वाटत नाही. अजूनही ब्राह्मणे माझ्या दवाखान्यात उपचारासाठी येतो. त्याच्यावर आणि त्याच्या घरच्या सर्वांवरही मी फुकट उपचार करते; त्यांना विनामूल्य औषधंही देते," असे डॉक्टरबाईदेखील म्हणाल्या. मायलेकाच्या या जगावेगळ्या क्षमाशीलतेने रावसाहेब अवाक्च झाले! कुठल्याही व्यावसायिकाच्या कल्पनेपलीकडचे हे औदार्य होते. या माणसांचे विचारविश्व किती वेगळे आहे याची रावसाहेबांना त्यावेळी जाणीव झाली. वडाळकर कुटुंबाची दुसरी एक जागा होती. तिथल्या खोल्यांमध्ये काही भाडेकरू राहत. त्यांच्यासाठी बांधलेल्या संडासाची भाडेकरूंनी खूप मोडतोड केली होती. तिथे ते खूप घाणही करून ठेवत. अनेकदा सांगूनही ते ऐकत नसत. शेवटी वैतागून डॉक्टरबाईंनी संडासला कुलूप लावून टाकले. चिडलेल्या भाडेकरूंनी भाडेनियंत्रण कायद्यान्वये त्यांच्यावर फौजदारी केस दाखल केली. रावसाहेबांनी डॉक्टरबाईंचे वकीलपत्र घेतले. "मी ते कुलूप लावलेलं नाही आणि दुसऱ्या कोणी लावलं ते मला माहीत नाही, असं कोर्टात सांगून तुम्ही मोकळ्या व्हा, म्हणजे मग केस चालवणं सोपं होईल, " रावसाहेब म्हणाले. "मी ईश्वराला स्मरून सांगते, मी मुळीच खोटं बोलणार नाही," डॉक्टरबाई तत्क्षणी उत्तरल्या. "अहो, तुम्ही कुलूप लावल्याचं कबूल केल्यास तुम्हांला दंड अथवा शिक्षा होऊ शकते. तसं सांगणं अतिशय धोक्याचं आहे," रावसाहेबांनी समजावले. "काहीही होऊ द्या, पण मी खोटं बोलणार नाही," डॉक्टरबाई उत्तरल्या. रावसाहेब आता चांगलेच काळजीत पडले. ही केस कशी लढवायची हा मोठाच प्रश्न होता. पण आपले सारे कौशल्य पणाला लावून रावसाहेबांनी खटला लढवला. गुन्ह्याचा इरादा काय (मोटिव्ह फॉर क्राइम ) हा मुद्दा कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता व त्याच मुद्द्यावर रावसाहेबांनी भर दिला होता. योगायोग म्हणजे बहरलेली वकिली... २५१