पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुर्दैवाने पुढे ज्ञानेश्वरचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. तोवर रावसाहेबही त्या इस्टेटीच्या जबाबदारीतून औपचारिकरीत्या मोकळे झाले होते. पण ज्ञानेश्वरची मुलेदेखील आजही रावसाहेबांच्या सल्ल्याशिवाय कुठलाही मोठा निर्णय घेत नाहीत. आश्चर्य वाटावे असे ऋणानुबंध आजही या दोन्ही कुटुंबांमध्ये आहेत. रावसाहेबांचे असेच एक अगदी जगावेगळे अशील म्हणजे डॉ. वडाळकरबाई. त्यांची सगळीच कहाणी खूप रोचक आहे. त्यांचे खरे नाम मेरी अब्राहम. त्या व त्यांचे यजमान डॉ. अब्राहम मूळचे केरळचे. ख्रिश्चन मिशनच्या कामासाठी त्या दोघांनी स्वत:ला वाहून घेतले होते. नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातील वडाळा या गावी असलेल्या एका मिशन हॉस्पिटलमध्ये दोघांनी अनेक वर्षे काम केले. पुढे १९४३ साली दोघे श्रीरामपूरला स्थायिक झाले व तिथे दोघांनी स्वत:चा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. वडाळा गावाहून आलेले म्हणून त्यांना सगळे वडाळकर म्हणत. अब्राहम शल्यविशारद होते तर त्यांच्या पत्नी प्रसूतिगृह चालवत. दोघेही आपल्या कामात खूप निष्णात होते. अत्यंत माफक फी घेऊन आणि खूपदातर काहीच पैसे न घेता ते उपचार करत. व्यावसायिक कौशल्यामुळे संपन्न कुटुंबे त्यांच्याकडे जात तर दयाळुवृत्तीमुळे गरीब कुटुंबांना त्यांचा आधार वाटे. सगळ्या परिसरात दोघेही खूप लोकप्रिय होते. पुढे डॉ. अब्राहम वारले पण वडाळकरबाईंनी आपला दवाखाना तसाच चालू ठेवला. आपल्या प्लॉटच्या एका कोपऱ्यात डॉक्टरबाईंनी ब्राह्मणे नावाच्या एका गरीब गृहस्थाला हॉटेल काढण्यासाठी काहीही भाडे न घेता जागा दिली होती. हा ब्राह्मणे त्यांचा पेशंटही होता आणि काहीही पैसे न घेता डॉक्टरबाई त्याच्यावर उपचारही करत असत. असे असतानाही याच गृहस्थाने खोटेनाटे कागदपत्र तयार केले व डॉक्टरबाईंचा तो सगळाच एक एकराचा प्लॉट स्वत:च बळकावला. डॉक्टरबाईंनी रावसाहेबांना वकीलपत्र दिले. वकील म्हणून रावसाहेबांचा त्यांच्याशी आलेला हा पहिलाच संपर्क. केसचा निकाल डॉक्टरबाईंच्या बाजूने लागला व ब्राह्मणेला जागेचा कबजा सोडावा लागला. पण नंतर ब्राह्मणे सहकुटुंब डॉक्टरबाईंकडे गेला व त्याने खूप गयावया केली. डॉक्टरबाई अतिशय दयाळू होत्या आणि येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार प्रत्यक्षातही चालणाऱ्या होत्या. त्यांनी ब्राह्मणेला उदार अंत:करणाने क्षमा केली व त्याच्या विनंतीला मान देऊन पुन्हा एकदा त्याला हॉटेलसाठी फुकट जागा दिली. पण काही वर्षांनी पुन्हा तोच प्रकार घडला. ब्राह्मणेने पुन्हा राजरोसपणे अतिक्रमण करून पुन्हा एकदा सगळ्याचा सगळा प्लॉट बळकावला. पुन्हा अजुनी चालतोची वाट... २५०