पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अशी वामनरावांची इच्छा होती. पण रावसाहेबांनी कधी त्याला होकार दिला नाही. काहीशा त्राग्यानेच मग तीन-चार महिन्यांनी केव्हातरी वामनराव ती मोटार घेऊन गेले. रावसाहेबांच्या या निरिच्छपणामुळेच वामनरावांना त्यांच्या विषयी अधिक आत्मीयता वाटायची. दोन मुली, पुढे वयपरत्वे वामनराव निवर्तले. त्यानंतर त्यांच्या तिन्ही बायका, ज्ञानेश्वर हा मुलगा व घरातले इतर वयस्क यांनी रावसाहेबांना बोलावून घेतले. आपली तब्येत ढासळत चालल्याचे जेव्हा वामनरावांना स्पष्ट जाणवले होते, तेव्हा त्यांनी घरच्या सगळ्यांना जवळ बोलावून घेतले होते आणि सांगितले होते, "माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास रावसाहेब सांगतील ते सर्वांनी ऐकावे आणि ज्ञानेश्वर मोठा होईस्तोवर इस्टेटीचे सर्व व्यवहार रावसाहेबांच्याच ताब्यात द्यावेत." त्या सांगण्यानुसार सर्व सूत्रे हाती घ्यायची घरच्यांनी रावसाहेबांना विनंती केली. रावसाहेब मोठ्या संभ्रमात पडले. वकिलीचा व्याप इतका होता, की पाच मिनिटांची फुरसत काढणेही त्यांना अवघड होते. त्याशिवाय स्वतःची शेती, अण्णासाहेबांची शेती, पाहुणेरावळे, कौटुंबिक जबाबदाऱ्या, समाजकार्य वगैरे अनेक व्याप त्यांच्यामागे होते. त्यामुळे वामनरावांच्या प्रॉपर्टीची ही अतिरिक्त जबाबदारी घ्यायची त्यांची तयारी नव्हती. पण वामनरावांच्या सगळ्या कुटुंबीयांनी अगदी एकमुखाने तसा आग्रह धरला व शेवटी त्यांच्या प्रेमापुढे रावसाहेबांना मान तुकवावी लागली. पुढची पंधरा वर्षे रावसाहेबांनी ही जबाबदारी अत्यंत दक्षतापूर्वक आणि सन्मानपूर्वक पार पाडली. पूर्वी रावसाहेबांच्या शेताची संपूर्ण मशागत करण्यासाठी वामनराव आपला ट्रॅक्टर पाठवत असत. रावसाहेबांनी ती प्रथा ताबडतोब थांबवली. वामनरावांच्या इस्टेटीपैकी सुतळीच्या तोड्याचाही कधी वापर करायचा नाही आणि आपल्याकडे याचे बोट दाखवायलाही कधी कोणाला वाव द्यायचा नाही असा त्यांनी पक्का निर्धार केला. वामनरावांची कुठलीही मुदत ठेव मोडायची नाही व शिल्लक रकमेला अजिबात धक्का लावायचा नाही असेही त्यांनी ठरवले. उलट उत्पन्नातून जास्तीत जास्त रक्कम शिल्लक टाकत त्यांनी मूळ मालमत्ता खूप वाढवली. वामनरावांच्या तिन्ही मुलींची लग्ने नियमित उत्पन्नातूनच त्यांनी केली. हे सर्व काम त्यांनी इतक्या सचोटीने व चोख केले, की ज्ञानेश्वर सज्ञान होताच सर्व कारभार त्याच्या हाती सुपूर्द करायची व स्वतः या जबाबदारीतून मोकळे व्हायची इच्छा जेव्हा रावसाहेबांनी व्यक्त केली, तेव्हा ज्ञानेश्वरसह सर्व उंडे कुटुंबीयांनी त्यांना एकमुखाने विरोध केला व आणखी तीन वर्षे सर्व व्यवहार रावसाहेबांच्याच हाती ठेवला. बहरलेली वकिली... २४९