पान:अजुनी चालतोची वाट...(रावसाहेब शिंदे - जीवन आणि कार्य).pdf/२४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रावसाहेब बसले होते. समोरच सगळे कागदपत्र पसरले होते. बघताबघता वामनरावांच्या पहिल्या दोन बायकांना दिलेल्या फारकतपत्रांचे दस्तऐवज त्यांच्या हाती आले. "त्यांच्या अन्नवस्त्रासाठी अलाहिदा व्यवस्था करत आहोत, " हे वाक्य वाचून त्यांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. दोघींनाही त्यांच्या त्यांच्या अन्नवस्त्रासाठी जमीन ताब्यात दिली आहे, असे दाखवता येणे व जमिनीचा कब्जेदार एकच नसून तीन जणांमध्ये ती वाटलेली आहे असे दाखवणे कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे हे त्यांच्या लक्षात आले. सर्वांत सुदैवाची गोष्ट म्हणजे हे फारकतपत्र ४ ऑगस्ट १९५९च्या पूर्वीचे, म्हणजेच सिलिंग अॅक्ट लागू झाला त्या दिवसापूर्वीचे होते. याचाच आधार घेऊन रावसाहेबांनी सगळे पुरावे गोळा केले व केस उभी केली. सरतेशेवटी वामनरावांची फक्त पंधरा एकर जमीन सरकारजमा झाली; पण बाकीचीही बहुतेक जाणार होती ती मात्र वाचली. यानंतर वामनरावांचा रावसाहेबांवरचा विश्वास एवढा वाढला, की उसाचे पेमेंट साखर कारखान्यातून मिळाल्यावर नोटांनी भरलेली मोठी पिशवी घेऊन ते रावसाहेबांकडे यायचे आणि त्यांच्यासमोर ठेवून जायचे; "हे सांभाळा" म्हणत. त्याकाळी उसाचे पेमेंट रोखच दिले जायचे; चेकने पेमेंट करायची पद्धत रूढ झाली नव्हती. रावसाहेबांनीच बँकेत वामनरावांच्या नावे खाते उघडले व त्यात ते आलेले पैसे जमा करू लागले; पुढे ते मुदत ठेवींमध्ये ठेवू लागले. वामनरावांना स्वत: ला लिहितावाचता येत नव्हते व अशा आर्थिक व्यवहारांची त्यांना काहीही माहिती नव्हती. वामनरावांचे इच्छापत्रही (विल) रावसाहेबांनीच लिहून काढले होते; वामनरावांनी त्यावर फक्त अंगठा उमटवला होता. स्वत:च्या नातेवाइकांपेक्षाही वामनरावांची रावसाहेबांच्या कुटुंबावर माया होती. रावसाहेबांना मुलगा झाला तेव्हा त्यांनी त्याच्यासाठी चक्क सोन्याचे दागिने करून आणले होते. शेतातल्या मालासारख्या भेटवस्तू तर नेहमीच्याच. 'कशाला उगाच' म्हणत रावसाहेबांनी जरा जरी नकार व्यक्त केला तरी वामनरावांना राग येई. रावसाहेबांकडे स्वत:चा ट्रॅक्टर नव्हता; त्यांच्या शेतीची नांगरट करण्यासाठी वामनराव आपला ट्रॅक्टर पाठवून देत. वर्षानुवर्षे त्यांनी ही प्रथा चालू ठेवली होती. रावसाहेबांना कुठे लांब जायचे असेल तर वामनराव आपली जीप पाठवून देत - तीही ड्रायव्हरसह आणि पेट्रोल भरून. मध्यंतरी एकदा वामनरावांनी अँबॅसेडर गाडी घेतली. रावसाहेबांकडे मोटार नाही हे पाहून त्यांनी ती रावसाहेबांकडे पाठवून दिली. जवळजवळ तीन महिने ती रावसाहेबांकडे होती. सहसा कधी ते ती वापरत नसत. क्वचित प्रसंगी कुठे जायला ते ती वापरत ; अशावेळी शशिकलाबाई ती चालवत असत. रावसाहेबांनी ती कायमचीच ठेवून घ्यावी - अजुनी चालतोची वाट... २४८